आता बोंबला...! धुळे शहरातील 15 दुकानदारांवर कारवाई निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

धुळे : राज्य शासनाच्या "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत अटी-शर्तींवर दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना या अटी-शर्तींचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याने महापालिकेच्या पथकांनी शहरातील विविध भागातील 15 दुकानदारांवर कठोर कारवाई निश्‍चित झाली असून तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर झाला आहे. 

धुळे : राज्य शासनाच्या "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत अटी-शर्तींवर दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना या अटी-शर्तींचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याने महापालिकेच्या पथकांनी शहरातील विविध भागातील 15 दुकानदारांवर कठोर कारवाई निश्‍चित झाली असून तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर झाला आहे. 
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दोन-अडीच महिने लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन शासनाने अटी-शर्तींवर दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, या अटी-शर्तींचे उल्लंघन करून दुकानदार, नागरिक शहरात फिरत आहेत, व्यवसाय करत आहेत. दरम्यान, अशा अटी-शर्तींचे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी नियुक्त पथकांनी काही दुकानदारांवर कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे. संबंधित पथकांच्या कामाचा आढावा आज महापालिका आयुक्‍त अजीज शेख यांच्या आदेशाने नोडल अधिकारी दीपकांत वाघ यांनी महापालिकेत घेतला. झोनल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकांनी त्यांच्या भागात सर्वेक्षण, प्रत्यक्ष पाहणी, चित्रीकरण केले आहे. या संबंधित दुकाने व आस्थापनांवर कारवाई प्रस्तावित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. 

पंधरा दुकाने रडारवर 
झोनल अधिकारी सी. एम. भामरे यांच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 16, 17 व 18 मधील सहा दुकाने, झोनल अधिकारी शिरीष जाधव यांच्या कार्यत्रेत्रातील प्रभाग क्रमांक 12 व 19 मधील पाच दुकाने तर झोनल अधिकारी अभय मरसाळे यांच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 7 व 15 मधील चार दुकानांवर कारवाई निश्‍चित करण्यात आली. तसा अहवाल आयुक्तांकडे सादर झाला. 

ही कारवाई शक्‍य 
संबंधित दुकानांवर प्रामुख्याने शॉप ऍक्‍ट परवाना रद्द करणे, दंडात्मक कारवाई, आदेशाचे उल्लंघन केल्याने शहरात व्यवसाय करण्यास प्रतिबंध अशा स्वरूपाची कठोर कारवाईचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत आदेश देण्यात आला. दरम्यान, शहरातील नागरिक, दुकानदारांनी नमूद अटी-शर्तींचे काटेकोर पालन करून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घ्यावी, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule lockdown no rules follow shop seal action