Loksabha 2019 : कॉंग्रेसकडून देशात अनाचार, दुराचार : मुख्यंमत्र्यांची टीका

Loksabha 2019 : कॉंग्रेसकडून देशात अनाचार, दुराचार : मुख्यंमत्र्यांची टीका

धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. या देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान कुणाच्या हातात सुरक्षित आहे याचा निर्णय घेणारी ही निवडणूक असल्याचेही ते म्हणाले. 
 
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपाख्य बाबासाहेब यांच्या प्रचारार्थ आज दुपारी साडेतीनला येथील शिवाजी रोडवरील कालिकामाता मंदिराजवळ भाजपची विजय संकल्प सभा झाली. मुख्यमंत्री फडणवीस, उमेदवार डॉ. भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, गुजरातमधील आमदार संगीता पाटील, आमदार विवेक पटेल, सुभाष देवरे, गजानन पाटील, उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, विनोद मोराणकर, उत्कर्ष पाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, अनिकेत पाटील, गोपाळ केले, शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाप्रमुख हिलाल माळी आदी उपस्थित होते. 

भामरेंकडून दुष्काळावर इलाज 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉंग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील उपाख्य दाजीसाहेब, आमदार कुणाल पाटील यांचा संदर्भ देत जिल्ह्यात एवढे वर्ष पाटलांचे राज्य होते, मात्र त्यांनी सामान्य माणसाचा विचार केला नसल्याची टीका केली. सुलवाडे- जामफळ योजना गेल्या आघाडी सरकारला करता आली नाही. आमच्या भाजप सरकारने योजनेसाठी अडीच हजार कोटी रुपये दिले असे म्हणत फडणवीस यांनी कुणीतरी दाजींसाहेबांना विचारले पाहिजे एवढे वर्षे तुमचे सरकार होते तुम्ही थेंबभर पाणी का आणू शकले नाही, असा सवाल केला. आम्ही एक डॉक्‍टर दिल्ली पाठविला, तर त्याने लोकांचा तर इलाज केलाच पण दुष्काळाचाही इलाज केल्याचे ते म्हणाले. अक्कलपाडा प्रकल्प झाला, आता मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग, "डीएमआयसी'च्या माध्यमातून लोकांच्या हातांना काम मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे येथे आहे, त्यामुळे येत्या काळात धुळे लॉजिस्टिक हब झाले तर आश्‍चर्य वाटायला नको, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

देशाची निवडणूक 
आम्ही जाती-पाती, धर्मावर मते मागितली नाही असे म्हणत फडणवीस यांनी आमदार कुणाल पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की हिंदू म्हणजे सहिष्णुता आहे. त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, म्हणून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक विकासाची आहे तशी राष्ट्रीय सुरक्षेचीदेखील आहे. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे असे म्हणत फडणवीस यांनी जम्मू- काश्‍मीरमधील सैन्य कमी करू, देशद्रोहाचे कलम काढू अशी आश्‍वासने कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात असल्याबद्दल टीका केली. कॉंग्रेसच्या "न्याय' योजनेचा संदर्भ देत जेव्हा-जेव्हा यांना संधी मिळाली तेव्हा यांनी त्यांच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्यांची गरिबी हटविल्याचे टीकास्त्र सोडले. 

पाटलांना ठेवा गल्लीत 
डॉ. भामरेंना मत दिले तर मोदींना ताकद मिळेल. मोदी एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन पुढे जातील. त्यामुळे देशासाठी मतदान करा. डॉ. भामरेंना पाठवा दिल्लीत आणि कुणाल पाटलांना ठेवा गल्लीत असा नाराही त्यांनी शेवटी जोडला. डॉ. भामरे यांनी खासदारकीच्या कार्यकाळात आणलेल्या योजनांचा लेखाजोखा मांडला व विरोधकांकडे मुद्दे नसल्याने आमदार घाणेरडे आरोप करत असल्याचे सांगितले. हिरामण गवळी यांनी सूत्रसंचालन केले. 

आमदार गोटेंवर अप्रत्यक्ष निशाणा 
आपण ज्या रस्त्यावर बसलो आहोत तो रस्ता देखील आपण दिलेल्या पैशातूनच तयार झाला आहे. आमच्या अपत्यांवर दुसरे लोकं आपली मालकी दाखवत असतील तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्याकडे हे खाते होते आणि आम्ही त्यासाठी पैसे दिले आहेत असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे आमदार अनिल गोटेंवर निशाणा साधला. त्यांना मनपा निवडणुकीतच लोकांनी नाकारले आहे. बाबांना पाडण्यात हातभार लावता आला तर लावावा. पण बाबा भामरेच निवडून येतील. त्यांच्याकडे आता धुळ्याची जनताच लक्ष देत नाही त्यामुळे ते कितीही वाईट बोलले, काही पोस्ट टाकल्या तरी त्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्लाही त्यांनी डॉ. भामरे यांना दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com