Loksabha 2019 : "कमळ' फुलवायचे तर जुने- नवे वाद मिटतील..? 

Loksabha 2019 : "कमळ' फुलवायचे तर जुने- नवे वाद मिटतील..? 

गेल्या निवडणुकीतील सत्ता परिवर्तनानंतर लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपला जुने- नवे वाद, गटबाजीचे ग्रहण लागले. त्याविषयी असंख्य कार्यकर्त्यांनी वारंवार कुरबुरी केल्या, तरी नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी गटबाजीकडे दुर्लक्ष केले. आता निवडणुकीत "कमळ' फुलवायचे असेल, तर जुने- नवे वाद, गटबाजी थोपविण्याचे आव्हान नेत्यांसह पक्षश्रेष्ठींसमोर उभे राहिल्याचे प्रमुख कार्यकर्तेही सांगतात. 

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात धुळे शहर आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, धुळे ग्रामीण व मालेगाव मध्य मतदारसंघ कॉंग्रेसकडे, मालेगाव बाह्य शिवसेना, तर बागलाण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आल्यानंतर खासदार डॉ. सुभाष भामरे यांना कालांतराने संरक्षण राज्यमंत्रिपद मिळाले. त्यासह मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग, सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजनेसाठी पाठपुरावा व मंजुरीच्या श्रेयावरून मंत्री भामरे यांना विरोधी पक्षांप्रमाणे स्वकियांकडूनही विरोध सुरू झाला. 

प्रकल्प "हायजॅक'; गोटे भडकले 
धुळे शहराचे आमदार अनिल गोटे हाताळत असलेले असे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंत्री भामरे यांनी "हायजॅक' केल्याने भामरे विरुद्ध गोटे, असा संघर्ष भाजपमध्ये सुरू झाला. तो इतका टोकाला गेला, की भामरे यांचा पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा जाहीर इशारा गोटे यांनी देऊन टाकला. भामरे आणि गोटे यांच्यात वारंवार खटके उडत असताना या संदर्भात सत्ता असूनही भाजपच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे पाहून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी "पक्ष बचाव' असा आक्रोश सुरू केला. त्याकडे वरिष्ठ नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केले. 

पक्ष प्रवेशावरून नवा वाद 
भरीस भर म्हणजे डिसेंबरमधील धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री भामरे व सहकारी मंत्र्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व इतर काही पक्षांमधील नाराज, मातब्बर पदाधिकारी, उमेदवार हेरून त्यांना भाजपमध्ये आणले. लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी हा फंडा वापरात आणला आहे. ही संधी साधत आमदार गोटे यांनी जुन्या पक्ष कार्यकर्त्यांनी फक्त आयुष्यभर झोरे उचलावेत का, त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी का देऊ नये, केंद्र आणि राज्यात भाजपप्रणीत सत्तेमुळे पोषक वातावरण असतानाही जुने, निष्ठावंतांना का डावलले जाते, अशा प्रश्‍नांची सरबत्ती करत मंत्री भामरे व सहकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षश्रेष्ठींसह वरिष्ठ कुठल्याही नेत्याने या वादाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मंत्री भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने झालेल्या अनेकांच्या पक्ष प्रवेशाला कुठलाही अडथळा उरला नाही. 
 
मालेगावमुळे डोकेदुखी वाढली 
सत्ता असूनही धुळे शहरातील गटबाजीत पोळल्या जाणाऱ्या भाजपपुढे मालेगावमधील अंतर्गत कलहामुळे आणखी डोकेदुखी वाढली. मालेगाव महापालिकेतील आयुक्तांच्या नियुक्तीवरून तेथील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी मंत्री भामरे यांच्यावर जाहीरपणे गंभीर आरोप केले. त्यावरून गायकवाड यांची पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचालीही मध्यंतरी सुरू झाल्या होत्या. अशात अद्वय हिरे यांनीही विविध आरोप करत, आमदार गोटे यांची "री' ओढत मंत्री भामरे यांच्याविरोधात रान पेटवले आहे. 

भामरे किल्ला लढवताहेत...पण 
खासदार निधी देण्यावरूनही पक्षीय अनेक कार्यकर्त्यांमध्ये रुसवे- फुगवे सुरू झाले. तारेवरची कसरत करत मंत्री भामरे विविध कामे, प्रकल्प मंजुरी, ते मार्गी लावण्याच्या पाठपुराव्यामागे लागले. जे सोबत त्यांना घेऊन ते पक्षांतर्गत किल्ला लढवत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात सभा घेऊन, अनेक विकासकामे, प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्‌घाटने करून मंत्री भामरे यांनी पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याचा, तर जनमानसात "विकास पुरुष', अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा; पण मतदारसंघात आता पुन्हा "कमळ' फुलवायचे असेल, तर जुने- नवे वाद, गटबाजी थोपविणार कोण, असा प्रश्‍न अनेक कार्यकर्ते उपस्थित करतात. पक्षांतर्गत अशी काटेरी वाट मंत्री भामरे कशी तुडवतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

...तर नवल वाटायला नको 
भाजपमधील जुने- नवे वाद, गटबाजीवर साडेचार ते पाच वर्षांत रामबाण उपाय न झाल्याने या प्रश्‍नाने आता पुन्हा लोकसभा निवडणुकीत डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. ही नवी डोकेदुखी भाजप नेते, पक्षश्रेष्ठींना सतावणार असल्याचे चित्र आहे. एकतर जुन्यांकडे लक्ष न देता नवे, जे येतील त्यांच्या सोबतीने निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपने उद्या घेतला, तर नवल वाटायला नको, असेही म्हटले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com