माजी आमदार कदमबांडे यांची सत्त्वपरीक्षाच! 

निखिल सूर्यवंशी
गुरुवार, 11 एप्रिल 2019

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मालेगावपाठोपाठ मुस्लिमबहुल धुळे शहर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. यात युती, आघाडीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी त्या- त्या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची चढाओढ असणार आहे. यात निवडणुकीचा निकाल काहीही असला, तरी त्याचा केंद्रबिंदू धुळे शहरावर पकड राखून असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हेच असणार आहेत. पाठोपाठ भाजप, शिवसेना, कॉंग्रेस शहराध्यक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल. 

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मालेगावपाठोपाठ मुस्लिमबहुल धुळे शहर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. यात युती, आघाडीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी त्या- त्या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची चढाओढ असणार आहे. यात निवडणुकीचा निकाल काहीही असला, तरी त्याचा केंद्रबिंदू धुळे शहरावर पकड राखून असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हेच असणार आहेत. पाठोपाठ भाजप, शिवसेना, कॉंग्रेस शहराध्यक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल. 

म राठा पाटील आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेला धुळे शहर विधानसभा मतदारसंघ विविध पक्षांतर्गत गटबाजी, शह- काटशहाचे राजकारण, श्रेयवाद, मनधरणीचे राजकारण, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीसह पत्रक युद्धामुळे नेहमी गाजत असतो. अलीकडे केंद्र व राज्यातील वरिष्ठ नेत्यांना डोकेदुखी ठरेल इतकी गटबाजी उफाळून आली आहे. यातील चटके सोसण्यापेक्षा काही अंतरावर राहिलेलेच बरे, या मनोभूमिकेत पक्षश्रेष्ठींसह बरेच वरिष्ठ नेते दिसतात. 

ठाव न लागू देणारा मतदारसंघ 
पंधरा वर्षे महापालिकेची सत्ता लीलया ताब्यात ठेवणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची ही पकड यंदा डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमतातून ढिली केली. तत्पूर्वी, मोठा जनसंपर्क, पाठपुराव्याला भक्कम, प्रभावातून धुळे विधानसभा मतदारसंघात सर्वदूर संबंध जोपासून असलेले श्री. कदमबांडे यांचा सतत तीन पंचवार्षिक निवडणुकांत भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पराभव केला आहे. तसेच अनेक महत्त्वाचे मोहरे राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेले. तसेच भगदाड शिवसेना, कॉंग्रेसला पाडण्यात भाजपला यश आले. असे असताना पडद्याआडून कोण कुणाला नेमकी मदत करतो, उट्टे- वचपा काढतो, अभद्र युती करतो याचा भल्याभल्यांना ठाव लागू न देणाऱ्या धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महापालिकेत 74 पैकी 50 जागा मिळविणाऱ्या भाजपचे पारडे मात्र जाणकारांकडून जड मानले जाते. याउलट मुस्लिमबहुल भाग कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला पोषक असल्याने या आघाडीची स्थिती तशी भक्कम मानली जाते. 

पडद्यामागच्या डावपेचांना गती 
जातीय समीकरणांचे अवलोकन केले तर आघाडीचा एकगठ्ठा मतदारांचा मुस्लिम समाज आणि बहुजन समाजावर डोळा असताना भाजप- युतीचा हिंदुत्वाच्या मुद्यावरून हिंदूंच्या मतावर डोळा असल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. त्यामुळे या घटकांच्या मतांचे विभाजन करून एकमेकांचा कसा राजकीय शक्तिपात करता येईल आणि आपापल्या पक्षाच्या विजयाचे गणित यशाकडे नेता येईल, अशा या पडद्यामागच्या डावपेचांना सध्या गती आली आहे. यात आघाडीच्या मताधिक्‍यप्रश्‍नी खऱ्या अर्थाने माजी आमदार कदमबांडे यांचीच सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम मानली जाते. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी आमदार कदमबांडे उमेदवार राहतील. युती न झाल्यास शिवसेनेकडून उमेदवारीचे दावेदार माजी आमदार प्रा. शरद पाटील, तसेच उमेदवारीचे दावेदार तथा भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी यांच्यावरही आपापल्या युती, आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळवून देण्याची जबाबदारी आहे. यातही श्री. परदेशी यांनी डॉ. भामरे यांच्याविरोधात सूर आवळला आहे. 

कार्यकारिणीचाही लागणार कस 
युतीचे उमेदवार डॉ. भामरे आणि आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचे मताधिक्‍य त्या- त्या प्रामाणिकपणे प्रचार कार्यात उतरलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या पराकाष्ठेवर अवलंबून असेल. त्यासाठी त्यांना घाम गाळावा लागणार आहे. आघाडीची मदार सर्वाधिक माजी आमदार कदमबांडे व सहकाऱ्यांवर असणार आहे. त्यांच्यासह डॉ. भामरे यांच्यापुढे नाराज गटांचेही काही प्रमाणात आव्हान आहे. अशी स्थिती "पॅच- अप' करण्यात नेते पुढे सरसावले आहेत. तसेच पाटील समाजाचे दोन तुल्यबळ उमेदवार रिंगणात असताना माजी आमदार कदमबांडे, माजी आमदार पाटील यांचा मराठा- पाटील समाजाचे अधिकाधिक मतदान आपल्या उमेदवाराला मिळण्यासाठी कस लागणार आहे. तीच जबाबदारी या समाजाचे इतर नेते, पदाधिकारी, तसेच बहुजन समाजाची मते आपापल्या उमेदवाराकडे आकृष्ट होण्यासाठी मित्रपक्षांसह शहर कार्यकारिणी, शाखा व विविध सेलप्रमुखांना कसोशीने पार पाडावी लागणार आहे. यात कुणाची सरशी होते ते जाणून घेण्याची सर्वांना उत्कंठा असेल. 

2014 मधील लोकसभा निवडणुकीची स्थिती 
(धुळे शहर विधानसभा मतदारसंघ) 
उमेदवार................पक्ष.................मिळालेली मते 
डॉ. सुभाष भामरे.....भाजप...............96,442 
अमरिशभाई पटेल....कॉंग्रेस..............49,487 
(कॉंग्रेसपेक्षा भाजपला 46,955 मतांचा "लीड') 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule loksabha election kadambande