Loksabha 2019 : औद्योगिक विकासामुळे धुळ्याला "अच्छे दिन' : सुरेश प्रभू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

धुळे ः पॉली कॅब कंपनी धुळ्यात यावी यासाठी प्रयत्न केल्यानंतर आता या कंपनीमुळे येथे अनेक लघु उद्योग येतील. शिवाय धुळ्यात आणखी काही उद्योग आणणार असून, त्यामुळे धुळ्याच्या औद्योगिक विकासाला चांगले दिवस येतील, असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे व्यक्त केला. मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गासह इतर विविध कामे करून भाजप महायुतीचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे मतदारसंघाला न्याय देण्याचे काम केल्याचेही प्रभू म्हणाले. 

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. भामरे यांच्या प्रचारासाठी मंत्री प्रभू हे धुळ्यात होते. येथील पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, गोपाळ केले, हिरामण गवळी आदी उपस्थित होते. 
श्री. प्रभू म्हणाले, की वाणिज्यमंत्री झाल्यानंतर पॉली कॅब कंपनी नाशिक, पुण्यात उभी करण्याचा कंपनी मालकांचा प्रयत्न होता. मात्र, मी त्यांना धुळ्यात आपला उद्योग उभारा असे सांगितले. या उद्योगासाठी जागाही घेतली गेली आहे. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार मिळेल. या मोठ्या उद्योगामुळे येथे अनेक लघु उद्योग उभे राहतील आणि अधिक चांगल्या पद्धतीने औद्योगिक विकास होईल. धुळ्यात आणखी काही सरकारी, खासगी उद्योग आणणार असल्याचेही प्रभू म्हणाले. 

रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा 
माझी मोठी बहीण धुळ्यात असल्याने 1968 पासून माझे धुळ्याशी संबंध आहेत. त्यामुळे धुळ्याचा विकास का होत नाही, असा नेहमीच प्रश्‍न असायचा. रेल्वेमंत्री झाल्यानंतर धुळ्याशी माझे असलेले भावनिक नाते आणि डॉ. भामरे यांचा प्रचंड पाठपुरावा त्यात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या इंदूरच्या असल्याने त्यांचे पाठबळ यामुळे मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग मंजूर करून "पिंकबुक'मध्ये आणला. या रेल्वेमार्गामुळे धुळे, मालेगावसह संपूर्ण परिसराला मोठा फायदा होणार आहे. डॉ. भामरे यांनी सिंचनासाठीही चांगले काम केले आहे त्यामुळे यावेळीही मतदार त्यांना निवडून देतील, असा विश्‍वास आहे. 

देशासाठी महत्त्वाची निवडणूक 
देशाचा विकास, राष्ट्रीय सुरक्षा, पाच वर्षांत केलेली कामे या एनडीए सरकारच्या जमेच्या बाजू आहेत, असे म्हणत ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची असल्याचे प्रभू म्हणाले. दरम्यान, सरकारने आता नवी उद्योग नीती तयार केली असून पुढील सरकार अस्तित्वात आल्यानंतर ही नीती जाहीर केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. भामरे यांनी मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग, पॉली कॅब कंपनीसाठी मंत्री प्रभू यांनी मोठी मदत केल्याचे सांगितले. 

Web Title: marathi news dhule loksabha election suresh prabhu