Loksabha 2019 : मोदींची सुप्त लाट भाजपला लाभदायक : मंत्री गिरीश महाजन

निखिल सूर्यवंशी
सोमवार, 15 एप्रिल 2019

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या आठही जागा निवडून येतील, असा दृढ विश्‍वास आहे. मोदींची सुप्त लाट पक्षाला यंदाही लाभदायक ठरेल. शिवाय प्रतिस्पर्धी कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदाचा सक्षम उमेदवार नसल्याने पोलादी पुरुष मोदी यांच्याकडेच पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. तसा विचार मतदार नक्की करतील, असा विश्‍वास जलसंपदामंत्री तथा उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या आठही जागा निवडून येतील, असा दृढ विश्‍वास आहे. मोदींची सुप्त लाट पक्षाला यंदाही लाभदायक ठरेल. शिवाय प्रतिस्पर्धी कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदाचा सक्षम उमेदवार नसल्याने पोलादी पुरुष मोदी यांच्याकडेच पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. तसा विचार मतदार नक्की करतील, असा विश्‍वास जलसंपदामंत्री तथा उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 
धु ळे महापालिकेसह जळगाव, नाशिक येथे भाजपचा झेंडा फडकला आहे. या महापालिकांच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा हाती घेऊन भाजप लढला. लोकसभा निवडणुकीचा मुद्दा वेगळा आहे. गटार, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन या मुद्यांना निश्‍चितच या निवडणुकीत प्राधान्य असेल. त्याचबरोबर देशहिताचा मुद्दाही विकासाच्या अजेंड्यात अग्रक्रमावर असेल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. 
 
देश कुणाच्या हाती द्यावा? 
आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत धुळे महापालिका क्षेत्रातील अनेक कामे निविदांसह मार्गी लागलेली दिसतील. त्याविषयी आश्‍वस्त करतो. त्या पलीकडे जाऊन देशाचा पंतप्रधान कोण असावा, कुणाच्या हातात देश द्यायचा, समोर कुणीही पंतप्रधानपदाचा दावेदार नाही या बाबींचाही विचार करावा लागेल. सद्यःस्थितीत भाजपचे राष्ट्रीय कणखर नेते नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार ठरत आहेत. त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे आहेत. या पक्षाचे शंभर खासदारही लोकसभा निवडणुकीत निवडून येणार नाहीत. या संदर्भात मतदारांना काय तो विचार करायचा आहे. 

धुळे मतदारसंघात अनुकूल स्थिती 
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निकालाबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही. भाजपचे नेते, महायुतीचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडून येतील, असा विश्‍वास आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. आता मोदींची सुप्त लाट आहे. त्याचेही कारण आहे. पाकिस्तानशी युद्धजन्य स्थिती देशात निर्माण झाली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून पोलादी पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये घुसून "एअर स्ट्राईक' केले. त्यापूर्वी "सर्जिकल स्ट्राईक' केले होते. यामुळे देशवासीयांचा मोदींवर विश्‍वास वाढला आहे. हे सर्व विषय देशवासीयांच्या मनात घर करून आहेत. 

कॉंग्रेसला स्थान नाही 
पूर्वी शेकडो जवान शहीद झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधानांनी शत्रू राष्ट्राला धमकावण्याची भूमिका घेतली नाही. कॉंग्रेस बोलायला तयार नाही. मग त्यांच्यावर देशवासीय कसा विश्‍वास ठेवणार? 125 कोटी लोकसंख्येच्या देशातील खासदार राहुल गांधी यांचे वागणे, बोलणे पाहिले तर त्यांच्यावर विश्‍वास ठेवायला सहजासहजी कुणी तयार नाही. देशवासीयांच्या मनात कॉंग्रेसला स्थान नाही. त्याचे प्रतिबिंब उत्तर महाराष्ट्रातही दिसते. या स्थितीचा भाजपला लाभ होऊ शकेल. 

प्रतिस्पर्धी तोलामोलाचेच... 
असे असले तरी भाजप महायुती उत्तर महाराष्ट्रातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना कमी लेखणार नाही. तोलामोलाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यात झुकते माप कुणाला द्यायचे, हे मतदार ठरवतील. मतदारसंघातील जनतेत जातीय समीकरणे, समाजाचा विषय उरलेला नाही. त्यांच्या मनात देशहित, राष्ट्रभक्ती, देशाची सुरक्षितता, विकासाचा प्रश्‍न घोळतो आहे. त्यासाठी कुणाच्या हातात देश व मतदारसंघ सोपवावा हे मतदारांना सांगण्याची गरज उरलेली नाही. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदारसंघातील आमच्या उमेदवाराला अधिक मताधिक्‍य मिळेल, हा विश्‍वास आहे. 

नेते एकत्र, पाठीशी जनता कुठे? 
निवडणुकीच्या कालावधीत कुठल्या पक्षात नाराजीचा सूर, गट नसतो? अनेक इच्छुक असतात, स्पर्धा असते, कमी-अधिक प्रमाणात नाराज असतात. त्यात सुमारे वीस लाख मतदारसंख्येचा धुळे मतदारसंघही अपवाद नसावा. त्यामुळे उमेदवाराचे काही खरे नाही, असे थोडेच काही घडत असते? उत्तर महाराष्ट्रात भाजपला आठ जागा मिळतील. धुळे मतदारसंघात प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आघाडीचे नेते एकत्र आले आहेत. मात्र, जनता त्यांच्या पाठीशी पाहिजे ना. धुळे महापालिका निवडणुकीत अनेकांनी काही तरी वल्गना केल्या. त्यांचे काय झाले, ते जनतेला चांगलेच ठाऊक आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचे काही प्रतिस्पर्धी स्टार प्रचारक होते. त्यांना एकही जागा निवडून आणता आली नाही. अशी स्थिती पाहता भाजपला आठही मतदारसंघ अनुकूल दिसत आहेत, असेही मंत्री महाजन यांनी नमूद केले. 

नंदुरबारला पक्षीय वाद...मिटवू... 
नंदुरबार मतदारसंघात भाजप पक्षांतर्गत वाद आहेत हे मान्य. तो मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना तो मिटला आहे. ही जागा हातून जाऊ नये म्हणून दक्ष आहोत, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. 

Web Title: marathi news dhule loksabha modi lat girish mahajan