पुढाऱ्यांकडूनही भक्कम मोर्चेबांधणी 

निखिल सूर्यवंशी
सोमवार, 25 मार्च 2019

कसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, मतांसाठी कुठल्या भागात बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे, मत विभाजनासाठी कुठले डावपेच अमलात आणले जात आहेत अशा एक ना अनेक बाबींचा वेध घेण्याचा प्रयत्न त्या- त्या पुढाऱ्यांकडून होत आहे. त्यात त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

कसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, मतांसाठी कुठल्या भागात बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे, मत विभाजनासाठी कुठले डावपेच अमलात आणले जात आहेत अशा एक ना अनेक बाबींचा वेध घेण्याचा प्रयत्न त्या- त्या पुढाऱ्यांकडून होत आहे. त्यात त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

भाजपचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि कॉंग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्यात काटा लढत होणार आहे. ही निवडणूक आपल्यासाठी तितकी सोपी नाही हे जाणून असल्याने ते वेगवेगळ्या डावपेचांवर भर देत आहेत. यात समर्थक उमेदवारासाठी पुढाऱ्यांनीही भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विकासाच्या मुद्यावर लढविल्या जात असलेल्या या निवडणुकीत मतांची गणिते सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे विविध समाज घटकातील समर्थक पुढाऱ्यांवर विश्‍वास टाकत उमेदवारांनी प्रचारात उडी घेतली आहे. 

मुस्लिमबहुल भागात सभा 
उमेदवार आमदार पाटील यांनी पहिली प्रचार सभा धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील मुस्लिमबहुल आविष्कार कॉलनीत घेतली. नेते साबीर शेख, शव्वाल अन्सारी, फक्रुद्दीन लोहार यांच्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे अनेक मुस्लीम नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. मुस्लिम समाज आघाडीचा पारंपरिक मतदार असल्याने त्यांना आकृष्ट करण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. यापाठोपाठ कॉंग्रेसच्या इतर पुढाऱ्यांनी आपल्या उमेदवाराचे पारडे जड होण्यासाठी कार्यक्षेत्रातील मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. त्यांनी सहा मतदारसंघातील सर्वसमावेशक मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. यात कॉंग्रेस आघाडीचे माजी मंत्री, आजी- माजी आमदार, खासदार, जिल्हा व शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. भाजप- शिवसेना युतीमधील नाराज गट आपल्या गळाला लावण्याचाही आघाडीकडून आटापिटा सुरू असल्याचे चित्र आहे. 

भाजपची समर्थकांवर भिस्त 
सत्ताधारी भाजपचे उमेदवार डॉ. भामरे यांनी गावोगावी प्रचार, सभा सुरू केल्या आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या विजयी 50 नगरसेवकांची बैठक घेत प्रचाराला सुरवात केली. शहरात या नगरसेवकांवर मताधिक्‍क्‍याची भिस्त ठेवत उमेदवार भामरे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावत रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. दोन मंत्री रिंगणात असल्याने भाजपचे शहर- जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर नेत्यांनीही या वर्चस्वाच्या लढाईत पक्षासाठी जिवाचे रान करण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेस आघाडीच्या पारंपरिक मतदारांवर डोळा ठेवत त्यांना कसे आपल्याकडे आकृष्ट करता येईल किंवा एक गठ्ठा मतदानाचा लाभ आघाडीला होऊ नये या दृष्टिकोनातून कुठले डावपेच अमलात आणावे लागतील याची आखणी भाजपकडून होत असल्याचे चित्र आहे. 
 
मातब्बरांमध्ये मतांसाठी रस्सीखेच 
दोन मंत्री आणि आमदारांमध्ये मतांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. साहजिकच त्यांच्यात मतांसाठी तोडफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती, तर कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी केली आहे. आघाडीने युतीच्या पराभवाचा चंग बांधला असून 26 ते 28 मार्चपर्यंत संयुक्त मेळावे घेण्याचे नियोजन केले आहे. याउलट शिवसेना युती धर्म पाळेल, असा विश्‍वास भाजपचे नेते व्यक्त करत असताना त्यांना शिवसेनेच्या नाराज गटांची समजूत काढण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule loksabha morche bancdhani