esakal | महाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’ 
sakal

बोलून बातमी शोधा

महाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’ 

काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना मिळून महाविकास आघाडीचे २१३ सदस्य दिसतात. मात्र, यातील बरेच सदस्य माजी मंत्री पटेल यांचे समर्थक असल्याने त्यांनी भाजपला मतदान करण्यात स्वारस्य मानले असावे.

महाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’ 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १) दहा केंद्रांवर सरासरी ९९.३१ टक्के मतदान झाले. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ३) मतमोजणी झाल्यावर निकाल जाहीर होईल.

आवश्य वाचा-  एकाचा मृतदेह बाहेर काढत नाही तोच दुसऱ्याने घेतली नदीत उडी आणि खळबळ माजली

यात कागदावर संख्याबळाने महाआघाडी ‘स्ट्राँग’, तर निकालात भाजपचे उमेदवार ‘स्ट्राँग’ असतील, असा होरा राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केला. 
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील दहा तहसील कार्यालयांतील मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत शांततेत मतदान झाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी, जिल्हाधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी धुळे शहरातील केंद्राची पाहणी केली. निवडणुकीसाठी धुळे ग्रामीण, साक्री, नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्राणी, तळोदा, अक्कलकुवा केंद्रांवर प्रत्येकी शंभर टक्के, तर शिंदखेडा येथे ९६.५५, शिरपूरला ९७.९६ टक्के मतदान झाले. 

निकालात भाजप स्ट्राँग 
ऐन विधानसभा निवडणुकीवेळी माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांनी अनेक समर्थक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात काही राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक होते. पक्ष बदलामुळे श्री. पटेल यांनी काँग्रेससह विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक झाली.

 वाचा- बंद घरात गुटख्याचे घबाड, पोलिसांनी टाकला रात्री छापा आणि सापडला पाच लाखा माल
 

संख्याबळ असे 

कागदावरील संख्याबळावर नजर टाकली, तर धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून भाजपचे १९९, काँग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, एमआयएमचे नऊ, समाजवादी पक्षाचे चार, बसप एक, मनसे एक आणि अपक्ष १० सदस्य दिसतात. यात काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना मिळून महाविकास आघाडीचे २१३ सदस्य दिसतात. मात्र, यातील बरेच सदस्य माजी मंत्री पटेल यांचे समर्थक असल्याने त्यांनी भाजपला मतदान करण्यात स्वारस्य मानले असावे. या स्थितीमुळे श्री. पटेल यांचा विजय झाल्यास आश्‍चर्य वाटू नये, असा होरा राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केला. असे असले तरी श्री. पटेल आणि महाविकास आघाडीचे स्पर्धक उमेदवार अभिजित पाटील यांना कशी मते मिळतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image