उल्लंघन आढळले तर मीच करतो कारवाई : महापौर सोनार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता सम-विषम सूत्रांवर आधारित व्यापार- व्यवसायाला परवानगी दिल्यानंतर अटी- शर्तींच्या उल्लंघनावरून शुक्रवारी (ता. 19) काही दुकानदार व महापालिकेचे कारवाई पथक यांच्यात वाद झाला, बाचाबाची झाली होती.

धुळे : "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या अटी- शर्तींचे पालन करूनच शहरातील दुकानदारांनी व्यवसाय करावा. त्यांना कोणताही त्रास होणार नाही. मात्र, अटी- शर्तींचे उल्लंघन होत असेल तर मी स्वतः कारवाई करीन, असा कठोर पवित्रा महापौर चंद्रकांत सोनार यांनी घेतला आहे. उद्यापासून (ता. 22) त्यांनी अशा कारवाईचा इशारा दिला आहे. 
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता सम-विषम सूत्रांवर आधारित व्यापार- व्यवसायाला परवानगी दिल्यानंतर अटी- शर्तींच्या उल्लंघनावरून शुक्रवारी (ता. 19) काही दुकानदार व महापालिकेचे कारवाई पथक यांच्यात वाद झाला, बाचाबाची झाली होती. हा वाद दुकानदारांनी आयुक्त अजीज शेख यांच्यापर्यंत नेल्यानंतर श्री. शेख यांनी प्रकरणाची उपायुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्‍वासन दुकानदारांना दिले होते. त्यामुळे हे प्रकरण येथे शांत झाले असे वाटत असतानाच काल पुन्हा व्यापाऱ्यांनी महापौर चंद्रकांत सोनार यांना निवेदन देत कारवाई पथकावर आरोप करून कारवाईची मागणी केली. विशेषतः अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव हेतुपुरस्सर दुकाने "सील' करतात, नियमबाह्य कार्यशैली वापरतात, अरेरावी करतात, प्रसंगी दुकानदारांना मारहाण करतात, दुकानांमध्ये बनावट ग्राहक पाठवून दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतात, असे आरोप व्यापाऱ्यांनी केले. 

महापौरांचा कठोर पवित्रा 
दरम्यान, याप्रश्‍नी महापौर सोनार यांनीही आता कठोर पवित्रा घेतल्याचे दिसते. उद्या (ता. 22) मी स्वतःच बाहेर पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या अटी- शर्ती, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले तर मी स्वतः कारवाई करीन. त्यामुळे दुकानदारांना विनंती आहे, की त्यांनी जे धोरण ठरवून दिले आहे, जी वेळ निश्‍चित करून दिली आहे त्यानुसार आपला व्यवसाय करावा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. दुकानदारांनी आपापल्या दुकानात सॅनिटायझर ठेवले पाहिजे, फिजिकल डिस्टन्सिंग राखले पाहिजे, मास्क वापरणे गरजेचे आहे, दुकानातून माल देताना हातात मोजे असणे गरजेचे असल्याचेही महापौर सोनार यांनी स्पष्ट केले
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule mayoe sonar altimetom corona lockdown