बेपत्ता मुख्याध्यापकाचा अखेर चौथ्या दिवशी मृतदेह सापडला !

भरत बागुल
Saturday, 24 October 2020

आश्रमशाळेमध्ये तंबाखूची पुडी घेऊन येतो, असे सांगून मुख्याध्यापक कापसे निघाले. मात्र, परत आलेच नाही.

पिंपळनेर  : सुकापुर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राहुल कापसे यांचा मृत्यूदेह अखेर चौथ्या दिवशी सकाळी सात वाजता लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्या जवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथील हरिओमनगरातील रहिवासी राहुल अंबादास कापसे (वय 40) बुधवारी (ता. 21) सुकापूरला आश्रमशाळेत गेले. आश्रमशाळेमध्ये तंबाखूची पुडी घेऊन येतो, असे सांगून मुख्याध्यापक कापसे निघाले. मात्र, परत आलेच नाही. सुकापूर गाव लाटीपाडा धरणाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर आहे. राहुल कापसे यांची दुचाकी धरणावर रोपवाटिकेचेजवळ लावली होती. तर चप्पल धरणावर आढळून आली. याबाबत त्यांची पत्नी प्रिया कापसे यांनी पिंपळनेर पोलिसांत पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. कापसे यांचा कोणताही पत्ता मिळून येत नसल्याने धुळे येथील आपत्ती व्यवस्थापनाची टीम पिंपळनेरला ता. 24 रोजी सकाळी लाटीपाडा धरणावर हजर झाली. त्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, हाती काहीच लागले नव्हते. कापसे यांच्या बेपत्ता होण्याने कोडे निर्माण झाले होते.

चौथ्या दिवशी सापडला मृतदेह

कापसे यांचा मृत्यूदेह शनिवारी अखेर चौथ्या दिवशी सकाळी सात वाजता लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्या जवळ मयत अवस्थेत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत आदित्य राहुल कापसे यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक चेतन सोनवणे हे करीत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule missing headmaster at Pimpalner was found on the fourth day