esakal | धुळे मनपाच्या बाहेर मनसेचे 'डफ बजाव' आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे मनपाच्या बाहेर मनसेचे 'डफ बजाव' आंदोलन 

कोरोनाबाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालय टप्प्याटप्प्याने अधिग्रहित करण्यात येणार होते मात्र हा विषय का थांबवण्यात आला? चिठ्ठ्य़ा टाकून हॉस्पिटल अधिग्रहित करण्याची पद्धत अतिशय चुकीचे आहे.

धुळे मनपाच्या बाहेर मनसेचे 'डफ बजाव' आंदोलन 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळेः कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यात व रुग्णांची दवाखान्यांमध्ये आर्थिक पिळवणूक होत असताना महापालिका प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे म्हणत प्रशासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी महापालिकेत डफ वाजवून आंदोलन केले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी थेट आयुक्तांच्या दालनाबाहेरही डफ वाजवला, ठिय्या आंदोलन केले. 

लगतच्या जिल्ह्यात व शहरांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येताना दिसत असताना धुळे महानगरपालिका क्षेत्रात मात्र विपरीत परिस्थिती आहे. महानगरपालिका उपाययोजना करत असल्याचे वर-वर दिसत असले तरी प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत वेळोवेळी मनसेने मनपा प्रशासनाला याबाबी निदर्शनास आणून दिल्या मात्र प्रशासन सुस्त असून नागरिकांना वाऱयावर सोडणार असेल तर ही परिस्थिती यापेक्षाही भयंकर होणार आहे व हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नसल्याचे मनसेने म्हटले आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालय टप्प्याटप्प्याने अधिग्रहित करण्यात येणार होते मात्र हा विषय का थांबवण्यात आला? चिठ्ठ्य़ा टाकून हॉस्पिटल अधिग्रहित करण्याची पद्धत अतिशय चुकीचे आहे. याबाबत प्रशासनाने खुलासा करावा. स्वॅब देणाऱ्या रुग्णांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते व एखादा व्हीआयपी आला तर तत्काळ त्याचा स्वॅब घेतला जातो हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना समज द्यावी.

शहरातील काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स कोरोनाबाधित रुग्णांकडून अव्वाच्यासव्वा बिले घेत आहे.त्यावर कारवाई होत नाही. या संदर्भात काय उपाययोजना होत आहेत त्याचा खुलासा करावा अशी मागणी मनसेने केली. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट जेवण, वेळेवर जेवण मिळत नसल्याचा मुद्दाही पक्षाने उपस्थित करत योग्य दखल घेण्याची मागणी केली. सायंकाळी काही भागांमध्ये दुकाने सुरू असतात काही भागात मात्र सक्तीने दुकाने बंद केली जातात. हा भेदभाव का? असे म्हणत याबाबतही कार्यवाही व्हावी. मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास महापालिकेला टाळे ठोकू असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. मनसेचे अॅड. दुष्यंतराजे देशमुख, संदीप जडे, अजित राजपूत, संजय सोनवणे, संतोष मिस्तरी, राजेश दुकाने, हेमंत हरणे, संजय सोनार, अनिल खेमनार, विष्णू मासाळ, नीलेश गुरव, संदीप ठाकूर आदींनी हे आंदोलन केले.