esakal | वडीलांच्या दुःखातून सावरत नाही तोच आईही गेली
sakal

बोलून बातमी शोधा

mother and father died

आई- वडीलांची माया अन्‌ त्‍यांचे मिळालेले छत्र एकाच वेळी जाणे यासारखे मोठे दुःख नाही. वडीलांचे निधन होण्यास आठ दिवस होत नाही; तोच आईची देखील प्राणज्‍योत मालवते अन्‌ शिंदे परिवाराचे छत्रच हरपले.

वडीलांच्या दुःखातून सावरत नाही तोच आईही गेली

sakal_logo
By
विनोद शिंदे

कुसुंबा (धुळे) : वयाची नव्वदी पार केलेली असताना अजूनही चांगले होते. परंतु तब्‍बेत बिघडते आणि उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल होतात. मात्र ते घरी परत आलेच नाही. वडील जाण्याचे दुःख अजून असतानाच मातृछत्र देखील हरपल्‍याने मोठा आघात शिंदे परिवारावर आला. पती- पत्नीचे आठ दिवसांच्या फरकाने मृत्यू ओढवल्याने गांवासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. 
कुसुंबा येथील जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम कौतिक शिंदे (वय ९४) यांचे ६ आक्टोंबरला धुळे येथील सुधा हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. वडीलांची सेवा केल्‍यानंतर देखील उपचारादरम्‍यान त्‍यांचे निधन झाल्‍याने शिंदे परिवार दुःखाच्या खाईत गेला. वडीलांचा दशक्रिया विधी अवघ्‍या दोन दिवसांवर असताना या परिवारावर आणखी एक दुःख आले.

पित्‍यासोबत मातृछत्रही हरपले
वडीलांच्या निधनाने शिंदे परीवार दुःखातून सावरत नाही; तोच त्यांच्या पत्नी विमलबाई तुकाराम शिंदे (वय ८०) यांचे देखील आज (ता. १३) सकाळी निधन झाले. वडिलानंतर आईनेही आठ दिवसांनी जगाचा निरोप घेतल्याने एकाच वेळी मातृ- पितृ वियोगाला सामोरे जावे लागले आहे. धुळे पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी पी. टी. शिंदे (मुलगा) व म्हाडाचे वरीष्ठ लिपीक केशव शिंदे (मुलगा), शिक्षिका कल्पना चव्हाण (मुलगी) यांच्यावर दुःख ओढवले. 

शतकपुर्ती सोहळा राहिला अपुर्ण
तुकाराम शिंदे यांनी वयाची नव्वदी कधीच पार केली होती. यामुळे शिंदे परीवारांला वडीलांचा शतकपुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात करण्याचा मानस होता. मात्र वडिलांचे शतक पाहण्याचे स्वप्न नियतीस मान्य झाले नाही.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image