राजकीय भूकंप होणार अन्‌ फडणवीस पुन्हा येणार : खासदार डॉ. भामरे

रमाकांत घोडराज
Monday, 26 October 2020

धुळे ग्रामिणमधून महापालिका क्षेत्रात आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातुन येथे विकासकामे करण्यात आली. श्री. फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही धुळे शहरासाठी मोठा निधी मिळवून घेतला. त्यातून शहराच्या प्रत्येक प्रभागात विकासकामे केली. मात्र राज्यातील भाजपाचे सरकार गेल्यानंतर विकासाला मोठी खीळ बसली आहे.

धुळे : राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर विकासाला मोठी खीळ बसली आहे. मात्र, येत्या सहा महिने ते वर्षभरात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन पुन्हा आपले सरकार येईल व देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे सुतोवाच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. 

हद्दवाढीने धुळे महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या बाळापूर येथील प्रभाग क्र. ११ मध्ये विविध कामांचे उदघाटन, लोकार्पण डॉ. भामरे यांच्याहस्ते रविवारी (ता.२५) झाले. उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती सुनील बैसाणे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, प्रभागाचे नगरसेवक संजय पाटील, प्रदीप कर्पे, वंदना थोरात, लक्ष्मी बागूल, छोटू थोरात, दिनेश बागुल आदी उपस्थित होते. बाळापूर येथे चार रस्ते, एकता नगरातील जलवाहिनी, सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन तथा लोकार्पण डॉ. भामरे यांच्याहस्ते झाला. 

भाजप सरकार गेल्‍यानंतर बसली खीळ
डॉ. भामरे म्हणाले, की बाळापूर गाव धुळे ग्रामिणमधून महापालिका क्षेत्रात आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातुन येथे विकासकामे करण्यात आली. श्री. फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही धुळे शहरासाठी मोठा निधी मिळवून घेतला. त्यातून शहराच्या प्रत्येक प्रभागात विकासकामे केली. मात्र राज्यातील भाजपाचे सरकार गेल्यानंतर विकासाला मोठी खीळ बसली आहे. मात्र, येत्या सहा महिने ते वर्षभरात आपले सरकार पुन्हा सत्तेवर येईल. शहराच्या पाणीप्रश्‍नावर नेहमीच चर्चा, वादविवाद होत आले आहेत. मात्र, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मिटेल. स्वच्छतेसाठी घंटागाड्यांचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भूमिगत गटारींचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर डेंग्यु, मलेरियासारख्या आजारांना आळा बसू शकेल. शंभर कोटीच्या निधीमधून डीपी रोडचे काम करण्यात येत आहे. 

गॅस पाइपलाइन होणार 
आगामी काळात धुळे शहरात पाइपलाइनद्वारे घरपोच स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध केला जाईल असेही डॉ. भामरे म्हणाले. पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा झाल्यानंतर गृहिणींना येणाऱ्या गॅसबाबतच्या अडचणी दूर होतील. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule mp subhash bhamre statment in program maharashtra goverment colaps