esakal | धुळे महापालिकेचे दवाखाने केवळ "प्रथमोपचार पेट्या'! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule muncipal corporation hospital

शहरात महापालिकेचे विविध भागात दवाखाने आहेत. शासनाच्या "एनयूएचएम' योजनेंतर्गतदेखील नवीन दवाखाने उभे राहात आहेत. महापालिकेचे हे दवाखाने मात्र केवळ ओपीडी असल्याने त्यांचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. 

धुळे महापालिकेचे दवाखाने केवळ "प्रथमोपचार पेट्या'! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : शहरातील महापालिकेचे दवाखाने म्हणजे प्राथमिक तपासणी करा.. गोळ्या घ्या..आणि घरी जा, अशा कार्यपद्धतीवर चालणारे आहेत. थोडक्‍यात "प्रथमोपचार पेटी'सारखी या दवाखान्यांची अवस्था आहे. अर्थात आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना या तोडक्‍या आरोग्य व्यवस्थेचा नाही म्हणायला मोठा आधार आहे. महापालिकेचे हे दवाखाने प्रथमोपचारापलीकडे अधिक चांगली सेवा देऊ शकले असते. पण, प्रशासनासह राजकीय अनास्थेमुळे ही आरोग्य व्यवस्था बळकट होऊ शकली नाही. "कोरोना'च्या संकटाचा धडा घेऊन तरी ही व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. 


कोरोना संकटात उपयोग काय? 
महापालिकेचे दवाखाने हे केवळ प्रथमोपचार केंद्र असल्याने कोरोनाचे महाभयानक संकट ओढवल्यानंतर मनपाच्या या आरोग्य व्यवस्थेचा किती उपयोग झाला, काय आधार मिळाला याचा विचार केला तर हे दवाखाने या संकटाच्या काळात फारसे उपयोगी ठरले नसल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर या रुग्णांवर उपचारासाठी, त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेची यंत्रणेला शहरात इतर खासगी, ट्रस्टच्या इमारती शोधाव्या लागल्या. काही वसतिगृहांची यासाठी मदत घ्यावी लागली. शिवाय उपचाराच्या अनुषंगाने मनपाचे दवाखाने कुचकामी ठरले. एवढेच नव्हे तर नॉन कोविड रुग्णांसाठी विविध ठिकाणी ओपीडी सुरू करण्याची वेळ आली. 

तर मोठा आधार मिळाला असता 
महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आंतररुग्ण सुविधा उपलब्ध असती तर किमान काही रुग्णांची व्यवस्था या दवाखान्यांमध्ये करता आली असती. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या व्यतिरिक्त इतर सामान्य आजारांच्या रुग्णांसाठी तरी हे दवाखाने मोठा आधार ठरली असती. सिव्हिल हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयावरचा भार कमी झाला असता. पण ते होऊ शकले नाही. 

नवीन दवाखानेही त्यात वाटेवर 
शासनाच्या "एनयूएचएम' अंतर्गत शहरात पाच दवाखाने मंजूर आहेत. आणखी पाच दवाखान्यांचा प्रस्ताव आहे. साधारण 45 ते 50 लाख रुपये खर्चातून चांगल्या इमारती उभ्या राहात असल्या तरी या इमारतीदेखील जुन्या दवाखान्यांसारखेच प्रथमोपचार केंद्र ठरणार आहेत. इमारत आहे, खाटांची व्यवस्था होऊ शकते, सुसज्ज यंत्रसामग्री बसवून विविध आजारांच्या रुग्णांवर येथे उपचार होऊ शकतात, मात्र सद्यःस्थितीत हे दवाखानेही जुन्या दवाखान्यांसारखेच ओपीडी बनले आहेत. 

- विविध भागात...दहा दवाखाने (ओपीडी) 
- दोन मॅटर्निटी केंद्र 
- एक कुटुंब कल्याण केंद्र 
- एक आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय 
- "एनयूएचएम'अंतर्गत नवीन दवाखाने...पाच 

- खाटांची संख्या...00 
- मॅटर्निटी केंद्रात... 25- 30 खाटांची व्यवस्था 
- मॅटर्निटी केंद्रांची नॉर्मल डिलिव्हरीची ख्याती 
- प्रसूतीसाठी शस्त्रक्रियेची गरज भासल्यास मात्र व्यवस्था नाही 
- सर्व दवाखान्यात दररोज साधारण 1200-1500 नवीन रुग्ण येतात 
- प्रथमोपचारापलीकडे उपचाराची गरज असल्यास रुग्णांची सिव्हिलमध्ये रवानगी 

loading image