राजकीय पक्ष तुपाशी, धुळेकर मात्र उपाशी ! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

महापालिकेत भाजपची आणि राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. तत्पूर्वी, महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची, तर राज्यात भाजपची सत्ता होती.

धुळे  ः अपवाद वगळता महापालिकेत ज्या राजकीय पक्षाची सत्ता, नेमके त्या उलट राज्यात विरोधी पक्षाची सत्ता, असा विसंगत खेळ दशकापासून सुरू आहे. त्यामुळे शहकाटशहाच्या राजकारणात नागरी सुविधांची पुरती वाट लागली आणि राजकीय पक्ष तुपाशी, तर धुळेकर मात्र उपाशी, असे चित्र अधोरेखित झाले. समस्यांच्या गर्तेतून कोण बाहेर काढेल, याची प्रतीक्षा धुळेकरांना लागून आहे. 

महापालिकेत भाजपची आणि राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. तत्पूर्वी, महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची, तर राज्यात भाजपची सत्ता होती. सत्तासंघर्षात त्या-त्या पक्षाने महापालिकेच्या तिजोरीची सूत्रे हाती ठेवली, तरी धुळेकरांचे विकासात्मकदृष्ट्या नशीब काही फळलेले नाही. शेजारचे शिरपूर, नंदुरबार, जळगाव, नाशिक शहर तुलनेत विकासात अग्रेसर असताना धुळे शहराची विकासाशी स्पर्धा करताना दमछाक होत आहे. 

प्रश्‍नांचा गुंता वाढताच 
भुयारी गटार योजनेमुळे ठिकठिकाणी रस्त्यांचे खोदकाम केल्याने शहराची पुरती वाट लागली आहे. खड्डे भरण्याचा फक्त देखावा केला जातो. प्रत्यक्षात नागरिकांना चिखलमय धुळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नावर अनेक पक्षांनी वर्षानुवर्षे पालिकेत सत्ता उपभोगली. तरीही नियोजन, व्यवस्थापनाअभावी दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात सर्वच पक्षांना अपयश आले आहे. जलस्रोत तुडुंब भरलेले असतानाही आठवडाभर धुळेकरांची तहान भागू शकत नाही, अशी गंभीर स्थिती आहे. कचरा संकलनाच्या ठेक्‍याचीही वाट लागल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसते. मोकाट जनावरे, कुत्र्यांचा प्रश्‍न महापालिका सोडवू शकलेली नाही. आरोग्यप्रश्‍नी महापालिका सक्षम झालेली नाही. शेजारच्या शिरपूर पालिकेने स्वतःचे रुग्णालय उभारले. मात्र, 2003 पासून स्थापन झालेली येथील महापालिका मनधरणीच्या राजकारणामुळे स्वतःचे रुग्णालय करू शकली नाही. महापालिकेची तिजोरी केवळ ओरबडण्याच्या संस्कृतीमुळे धुळेकर प्राथमिक व मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहेत. मनोरंजनाचे स्थळ अद्याप निर्माण होऊ शकलेले नाही. असे अनेक प्रश्‍न आजही तुंबून पडले आहेत. हद्दवाढीत समाविष्ट झालेली 11 गावे स्वतःच्या नशिबाला कोसताना दिसतात. 

राजकारणामुळे धुळेकर व्यथित 
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, ठाकरे सरकारच्या इशाऱ्यावर महापालिका व जिल्हा प्रशासन नाचत असल्याने मागणी करूनही लॉकडाउन केले जात नसल्याचा व सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. कोरोना संकटात राजकारण होत असल्याचे पाहून धुळेकर व्यथित झाले आहेत. असाच राजकीय खेळ वर्षानुवर्षे चालत असल्याने राजकीय पक्ष तुपाशी, धुळेकर मात्र उपाशीच राहात असल्याचा सार्वत्रिक सूर उमटत आहे. या स्थितीतून धुळेकरांची केव्हा सुटका होईल, याची प्रतीक्षा आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule muncipal Corporation Political party power struggle but not Civic amenities