अरेरे... ठेकेदार भाजपलाही जुमानत नाही...धुळ्यात कचरा संकलनाचा प्रश्‍न ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

तीन वर्षांसाठी कचरा संकलनाचा 17 कोटींचा ठेका नाशिकच्या कंपनीला दिला आहे. त्याचे विविध प्रताप, कारनामे काही राजकीय संघटनांनी व्हिडिओ क्‍लिपद्वारे चव्हाट्यावर आणले आहेत.

धुळे : सतत वादग्रस्त ठरूनही येथील महापालिकेच्या कृपाशीर्वादामुळे कचरा संकलनाचा ठेका सुकरपणे सुरू आहे. तक्रारीनंतरही कुठलाच फरक पडत नसल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी ठेकेदार आणि प्रशासनापुढे फिके पडल्याचे दिसून येते. येत्या दोन आठवड्यांत प्रभाग 17 मध्ये रोज कचरा संकलन झाले नाही, तर आयुक्तांच्या दालनातच उपोषण सुरू करू, असा इशारा देण्याची वेळ चार नगरसेवकांवर आली. यातून "अरेरे, ठेकेदार भाजपला जुमानत नाही,' असा सूर वर्तुळात उमटत आहे. 

भाजपच्या नगरसेविका शीतल नवले, अमोल मासुळे, नगरसेविका सुरेखा उगले, वंदना मराठे यांनी कचरा संकलनप्रश्‍नी आयुक्त अजीज शेख यांची भेट घेत तक्रार केली. 15 दिवसांत प्रभागात चार घंटागाड्या आणि आवश्‍यक ट्रॅक्‍टरद्वारे पूर्ण कचरा रोज उचलला नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कलम 144 चे पालन करत दालनात उपोषणाला बसू, असा इशारा दिला. 

घंटागाडीचे दर्शन दुर्लभ 
वजन आणि बिल वाढविण्यासाठी घंटागाडीत माती, विटा भरणे, तक्रारी किंवा कुणी आवाज उठविल्यानंतर नव्याचे नऊ दिवस चांगले काम दाखविणे, नंतर कारभारात पुन्हा अनियमिततेचे दर्शन घडविणे आणि कोरोनाच्या संकटात घंटागाड्यांचे दर्शन दुर्लभच झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचणे, घाणीचे साम्राज्य पसरल्याच्या तक्रारी आहेत. बहुतांश वेळा कागदावरच कचरा उचलला जात असल्याचे रंगवून बिले काढण्यात प्रशासन धन्यता मानत आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न अधूनमधून डोके वर काढतो. तीन वर्षांसाठी कचरा संकलनाचा 17 कोटींचा ठेका नाशिकच्या कंपनीला दिला आहे. त्याचे विविध प्रताप, कारनामे काही राजकीय संघटनांनी व्हिडिओ क्‍लिपद्वारे चव्हाट्यावर आणले आहेत. मात्र, ठोस कारवाई झालेली नाही. 

प्रभाग 17 साठी चार घंटागाड्या असूनही ठेकेदारातर्फे दोन किंवा तीन गाड्या सुरू ठेवल्या जातात. यामुळे काही कॉलन्यांमधील कचरा सात ते आठ दिवस उचलला जात नाही. कचराकुंडीतील कचरा नेला जात नाही. त्यामुळे नागरिकांचा नगरसेवकांवर रोष निर्माण होतो. कोरोनामुळे कचऱ्याप्रश्‍नी तक्रार केली जात नव्हती. मात्र, नागरिकांकडून स्वच्छतेबाबत विचारणा होऊ लागल्याने तक्रार करावी लागत असल्याचे नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले. 

-
गोलमाल है भाई... 
प्रभाग 17 मधील नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले, की ठेकेदार घंटागाडीद्वारे कचरा उचलत नाही. चार महिन्यांपासून प्रभागातून किती कचरा उचलला, याची माहिती कचरा डेपोवरील वजनकाट्याद्वारे मिळू शकते. याचा अर्थ ठेकेदार पूर्णपणे कचरा न उचलता संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन कागदावरच कचरा उचलत असल्याचे स्पष्ट होऊ शकते. या संदर्भात प्रशासनाने चौकशी करावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule muncipal Corporation The question of waste collection Contractor not respons