esakal | धुळ्याचे आयुक्त कामांची गुणवत्ता तपासणार 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्याचे आयुक्त कामांची गुणवत्ता तपासणार 

एमजेपीनेही या कामांकडे लक्ष घालण्याची गरज बैठकीतून व्यक्त झाली. आजघडीला सुरू असलेले काम प्राधान्याने पूर्ण केल्यानंतरच पुढील कामांना सुरुवात करण्याबाबतही बैठकीत ठरले

धुळ्याचे आयुक्त कामांची गुणवत्ता तपासणार 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः भुयारी गटार, पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाला गती देण्याबरोबरच सर्व कामे गुणवत्तापूर्ण करा, या सर्व कामांची गुणवत्ता तपासणार आहोत अशी तंबी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी ठेकेदाराला दिली. 

शहरातील देवपूर भागात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. याशिवाय १३६ कोटीची पाणीपुरवठा योजना व अक्कलपाडा पाणी योजनेचे कामही सुरू आहे. दरम्यान, विशेषतः भुयारी गटार व १३६ कोटीच्या पाणी योजनेंतर्गत निकृष्ट कामांबाबत तक्रारी, रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना होत असलेला त्रास व ठेकेदाराकडून संथगतीने सुरू असलेले काम या पार्श्वभूमीवर आयुक्त अजीज शेख यांनी आज (ता.२५) ठेकेदार, एमजेपीचे अधिकारी यांची बैठक घेतली. 

एमजेपीनेही लक्ष देण्याची गरज 
भुयारी गटार योजना दीर्घकालीन उपयोगासाठी असल्याने या योजनेचे काम गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे कामाबाबत तातडीने सुधारणा करा असे निर्देश ठेकेदाराच्या प्रतिनिधीला देण्यात आले. तसेच झालेल्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन गुणवत्ता तपासण्यात येईल असेही बजावले. आत्तापर्यंत झालेल्या कामात ज्या त्रुटी राहिल्या त्याही दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तत्काळ आराखडा घ्यावा

भुयारी गटार योजनेंतर्गत चेंबर, रस्ता रिफिलिंग, रोलिंगची कामे ठेकेदारांकडून अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्याच्या सूचना एमजेपीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच ठेकेदाराकडून तत्काळ कृती आराखडा घ्यावा. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना व यापूर्वीची १३६ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image