esakal | धुळ्यात सोशल डिस्टन्सिंगवरून तरुणाचा खून 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात सोशल डिस्टन्सिंगवरून तरुणाचा खून 

काही वेळापूर्वी बैठकीत झालेला वाद उकरून काढला. ‘तुझ्या वडिलांनी बैठक का घेतली’, असा जाब बाशिरला विचारला आणि त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

धुळ्यात सोशल डिस्टन्सिंगवरून तरुणाचा खून 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : नमाजपठणावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याच्या वादातून मामेभावाने कुटुंबातील साथीदारांच्या मदतीने नात्यातील २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री चाळीसगाव रोड परिसरात घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी काही तासांत संशयित चौघांना अटक केली असून, एक फरारी आहे. 


९ ऑगस्टला रात्री सव्वानऊनंतर चाळीसगाव रोड परिसरातील साबीर शेख यांच्या व्यापारी संकुलामागे दारूलसलाम प्रार्थनास्थळाजवळ सार्वजनिक जागेत बैठक होती. शालक अब्दुल रज्जाक लियाकत खानने फिर्यादी अब्दुल्ला खान यांना सांगितले, की तुम्ही प्रार्थनास्थळात नमाजपठाणासाठी आल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, अन्यथा प्रार्थनास्थळाला कुलूप लावेल. त्यावरून वादाला सुरवात झाली. 


प्रार्थनास्थळ कुणाच्या बापाचे नाही, असे अब्दुल खान यांनी सुनावताच शालकाचा मुलगा इकराम खान रज्जाक खानने फिर्यादीचा मुलगा ताहिरला, ‘तुझा खिमा बनवून टाकेन’, असे सांगत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मात्र, बैठकीतील उपस्थितांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. नंतर उपस्थित आपापल्या घरी निघून गेले. परिसरात साहील हॉटेलमध्ये फिर्यादी अब्दुल्ला खान यांचा सोफा बनविण्याचा कारखाना आहे. तेथे रात्री झोपायला जा, असे बाशितला वडिलांनी सांगितले. त्यामुळे बाशित, मोहंमद कैफ आणि अरबाज खान बुलेटने कारखान्यास्थळी गेले. रविवारी रात्री साडेदहाला बाशितने मोबाईलद्वारे ताहिरला, ‘तू लवकर साबीर शेख यांच्या संकुलाजवळ ये’, असा निरोप दिला. तेथे अब्दुल रज्जाक लियाकत खान, इमरान खान अब्दुल रज्जाक खान, पल्लू अब्दुल रज्जाक खान, इकराम रज्जाक खान, इजार ऊर्फ राजा रज्जाक खान (सर्व रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड) यांनी बाशितला अडविले होते. 


या पाच जणांनी काही वेळापूर्वी बैठकीत झालेला वाद उकरून काढला. ‘तुझ्या वडिलांनी बैठक का घेतली’, असा जाब बाशिरला विचारला आणि त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. यात बाशिरवर इमरान खान अब्दुल रज्जाक खानने चाकूने गंभीर वार केले. यात जखमी बाशिर ठार झाला. या कालावधीत ताहीर, अब्दुल रशीद, मोहंमद जाकीर खान मोटारसायकलने घटनास्थळी पोचले. ताहीरने वडील अब्दुल खान यांना बाशिदच्या पोटाला चाकू लागल्याने रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयात नेताना बाशिर गतप्राण झाले. याप्रकरणी वडील अब्दुल्ला अतिर्कुर रहेमान खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अब्दुल रज्जाक खान, इमरान खान, पल्लू खान, इकराम खान, इजार ऊर्फ राजा खान यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मध्यरात्री तीननंतर तपासचक्रे फिरवत संशयित अब्दुल रज्जाक खान, इमरान खान, पल्लू खान, इकराम खान यांना अटक केली. राजा खान फारारी झाला आहे.  

 
संपादन-भूषण श्रीखंडे