esakal | धुळे- नंदुरबार जिल्हा बँक निवडणुक..संस्था सभासद प्रतिनिधींचे ठराव मागवले 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule nandurbar distirict bank

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १० डिसेंबर २०१९ रोजीच्या पत्रानुसार जिल्हा बँकेच्या सभासद यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्राधिकरणाने २३ डिसेंबरला बँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागणीच्या अंतिम कालावधीत ३१ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती.

धुळे- नंदुरबार जिल्हा बँक निवडणुक..संस्था सभासद प्रतिनिधींचे ठराव मागवले 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थगित झालेली निवडणूक घेण्यास जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी डॉ. ज्योती लाटकर यांनी गुरुवारी (ता. ११) आदेश दिले. त्यानुसार बँकेच्या संस्था सभासद प्रतिनिधींचे ठराव १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत मागविण्यात आले आहेत. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर एप्रिलअखेर किंवा मेमध्ये बँकेची निवडणूक होण्याची शक्यता असेल. 
 
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १० डिसेंबर २०१९ रोजीच्या पत्रानुसार जिल्हा बँकेच्या सभासद यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्राधिकरणाने २३ डिसेंबरला बँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागणीच्या अंतिम कालावधीत ३१ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती. यात २७ जानेवारीला उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ज्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे सुरू झाले, अशा संस्था वगळून राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा आदेश पारित झाला होता. 

पाच दिवसांची स्‍थगिती होती
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने २७ जानेवारीला ठराव मागवण्याची प्रक्रिया व मतदारयादी प्रसिद्धीची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविली होती. त्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ठराव मागवण्याची प्रक्रिया पाच दिवसांसाठी स्थगित झाली होती. दोन फेब्रुवारी २०२१ च्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश देण्यात आला. त्याप्रमाणे प्राधिकरणाने दहा फेब्रुवारीला निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या असतील, त्या टप्प्यापासून पुढे सुरू करण्याचा आदेश दिला आहे. 

बँकेस प्रक्रिया लागू
मतदारयादीच्या कार्यक्रमातही सुधारणा करत २७ ते ३१ जानेवारी २०२० या मुदतीत थांबलेली संस्था सभासद प्रतिनिधींचा ठराव दाखल करण्याची प्रक्रिया आता १५ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत राबविली जाईल. हा कालावधी व प्रक्रिया धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला लागू आहे. तसेच या निवडणुकीसाठी पूर्वी प्राप्त झालेले संस्था प्रतिनिधींचे ठराव ग्राह्य धरले जातील. ते प्राप्त झाल्यानंतर मतदारयाद्या तयार होतील. प्राथमिक मतदारयादी प्रसिद्धीनंतर आक्षेप व हरकती मागविल्या जातील. त्यावर सुनावणी होऊन महिनाभरात अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे एप्रिलअखेर किंवा मेमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक होणे शक्य आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे