esakal | धुळे, नंदुरबार सरकारी कर्मचारी बँकेवर पहिल्यांदाच महिला चेअरमन 

बोलून बातमी शोधा

vidya shinde}

धुळे, नंदुरबार ग. स. बँकेची स्थापना सन १९२१ मध्ये झाली असून आतापर्यंत चार प्रशासक वगळून ७६ पुरुष चेअरमन होउन गेले आहेत. 
बँकेच्या ७७ व्या चेअरमन म्हणून विद्या शिंदे यांना संधी मिळाली आहे.

धुळे, नंदुरबार सरकारी कर्मचारी बँकेवर पहिल्यांदाच महिला चेअरमन 
sakal_logo
By
विनोद शिंदे

कुसुंबा (धुळे) : धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक अशा पाच जिल्ह्यांमध्ये विस्तार असलेल्या सरकारी नोकरांच्या सहकारी बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चेअरमन म्हणून कुसुंब्याच्या स्नुषा विद्या शिंदे (मोरे) यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. 
धुळे, नंदुरबार ग. स. बँकेची स्थापना सन १९२१ मध्ये झाली असून आतापर्यंत चार प्रशासक वगळून ७६ पुरुष चेअरमन होउन गेले आहेत. 
बँकेच्या ७७ व्या चेअरमन म्हणून विद्या शिंदे यांना संधी मिळाली आहे. बँकेची निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये होऊन निवडणूक पॅनलप्रमुख निशांत रंधे व रवींद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य पॅनलने सर्वच्या सर्व जागा बहुमताने जिंकत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. आता नुकतीच चेअरमनपदी शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. बँकेच्या शताब्दी वर्षांत महिला चेअरमन झाल्याने कुसुंबेकरांनी आनंद व्यक्त केला आहे. 

शिंदेच्या घरात राजकीय वारसा
नवनिर्वाचित चेअरमन शिंदे यांना मुळातच राजकीय वारसा लाभलेला आहे. सासरे कै. वेडू शिंदे हे धुळे पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच जवाहर रोटो रेशीम सूतगिरणीचे व्हा. चेअरमन, कुसुंबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व शिंदे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. तर सासू सुलोचनाबाई शिंदे ह्या धुळे जिल्हा कृषी बाजार समीतीच्या संचालिका राहिल्या आहेत, तर पती प्रा. शिक्षक संजय शिंदे याच बँकेचे माजी संचालक आहेत. गत शंभर वर्षांच्या कार्यकाळात बँकेवर चेअरमन म्हणून कुसुंब्याचे कै. भास्कर शिंदे, कै. शालीग्राम शिंदे व आता विद्या शिंदे (मोरे) यांना संधी मिळाली आहे. बँकेच्या सुमारे सोळा हजार सभासदांसह ठेवीदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम शिंदे यांना करावे लागणार आहे. 
 
बँकेच्या शताब्दी वर्षात बिनविरोध निवड झाल्याने पॅनलप्रमुखांसह सर्व सहकाऱ्यांचे आभार. येत्या काळांत बँकेचे उत्पन्न वाढवत व्याजदर कमी करून सभासदांना लाभांश देण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्तीचा अवलंब करून कर्ज मर्यादा वाढवून, कर्मचाऱ्यांचा पगारही वाढविण्याबाबत प्रयत्नशील आहे. सर्वांनाबरोबर घेऊन ठेवीदारांमध्ये बँकेविषयी दृढ विश्वास निर्माण करणार आहे. 
- विद्या शिंदे, नवनिर्वाचित चेअरमन 

संपादन ः राजेश सोनवणे