esakal | "कोरोना इफेक्‍ट' : धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणूक दोन महिने स्थगित
sakal

बोलून बातमी शोधा

amrish patel abhijit patil

धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणुकीसाठी पाच मार्चला अधिसूचना प्रसिद्ध झाली. 12 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले. तसेच 30 मार्चला मतदान होणार होते. मात्र, "कोरोना'मुळे राबविल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांमुळे निवडणूक पार पाडणे जिकरीचे आहे,

"कोरोना इफेक्‍ट' : धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणूक दोन महिने स्थगित

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : "कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यात अवघी प्रशासकीय यंत्रणा जुंपल्याने धुळे- नंदुरबार विधान परिषदेची निवडणूक स्थगित झाली आहे. ती निवडणूक आयोगाने दोन महिने पुढे ढकलली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी ही माहिती दिली.

धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणुकीसाठी पाच मार्चला अधिसूचना प्रसिद्ध झाली. 12 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले. तसेच 30 मार्चला मतदान होणार होते. मात्र, "कोरोना'मुळे राबविल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांमुळे निवडणूक पार पाडणे जिकरीचे आहे, त्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगाला पाठविला. तो मंजुरीसह प्रक्रिया स्थगित करत निवडणूक दोन महिने पुढे ढकलली आहे.
निवडणुकीत भाजपचे नेते अमरिशभाई पटेल विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते अभिजित पाटील यांच्यात दुरंगी सामना रंगत होता. विशेष म्हणजे वडील मोतीलाल पाटील भाजपत, तर मुलगा अभिजित पाटील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना महाआघाडीचे उमेदवार असल्याने निवडणुकीत रंगत वाढली. अमरिशभाई पटेल यांनी विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेससह आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधान परिषदेची धुळे- नंदुरबार मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ती बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्नही निष्फळ ठरले होते.
धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले 412, तर स्वीकृत 28 सदस्य, असे एकूण 440 सदस्य मतदानासाठी पात्र आहेत. मात्र, धुळे महापालिकेतील लोकसंग्राम संघटनेच्या सदस्या हेमा अनिल गोटे व शिंदखेडा नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिला आहे. धुळे महापालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरविले आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या 437 झाली. धुळे- नंदुरबार विधान परिषद मतदारसंघात भाजपचे 199, कॉंग्रेसचे 157, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 4, बसपचा 1, मनसेचा 1 आणि अपक्ष दहा सदस्य मतदार आहेत.

loading image