esakal | अब्‍दुल सत्‍तारांना बिर्याणी आठवते; तेव्हाच धुळ्यात येतात का?
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar

अब्‍दुल सत्‍तारांना बिर्याणी आठवते; तेव्हाच धुळ्यात येतात का?

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्‍याने रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत. या स्थितीत पालकमंत्री आहेत कुठे, ते फक्त बिर्याणीसाठी धुळ्यात येतात का? असा संतप्त सवाल सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केला.

काही फोटोछाप, पत्रकबहाद्दर भाजपच्या नगरसेवकांवर आरोप करून त्यांच्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. अशा पत्रकबाजांच्या निषेधाचा ठराव करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. तसा ठरावही सभापतींनी सभेत पारीत केला. सभापती संजय जाधव अध्यक्षस्थानी होते. उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक शीतल नवले, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, कमलेश देवरे, सुनील बैसाणे, नगरसेविका किरण कुलेवार, भारती माळी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

काम केलेले दाखवा सत्‍कार करू

बोरसे आणि मासुळे म्हणाले, की गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी जीव धोक्यात टाकून काम करीत होते. तेव्हा पत्रकबाज कोठे होते? शिवसेनेसह पालकमंत्र्यांनी काय काम केले ते दाखवावे. त्यांचा सत्कार करू. या स्थितीत शिवसेनेने राजकारण करू नये. बोरसे यांनी पालकमंत्र्यांमुळे दलित वस्तीचा निधी परत गेल्याचे सांगितले. नवले म्हणाले, की शिवभोजन थाळीबाबत सरकराचे श्रेय शिवसेना घेत आहे. पालकमंत्र्यांनी नगरोत्थान योजनेचा १५ कोटींचा निधी दुसरीकडे वळविला. रेमडेसिव्हिरच्या काळ्याबाजारावर नियंत्रण नाही.

भाजपच्‍या बदनामीसाठी पोस्‍ट व्‍हाययल

पटेल यांनी अतिसाराच्या आजाराचा मुद्दा मांडत उपाययोजनांची मागणी केली. सभापती जाधव म्हणाले, की केवळ भाजपच्या बदनामीसाठी पत्रके सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा उद्योग विरोधक करीत आहेत. सत्ता असूनही विरोधक विद्युत दाहिनी, रेमडेसिव्हिरचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. याबाबत पत्रक काढणारे पालकमंत्र्यांना जाब विचारू शकत नाही. बैसाणे यांनी केवळ विरोधाला विरोध करू नका. ही राजकारण करण्याची वेळ नाही, मनपाने हवेबाबत ऑक्सिजननिर्मितीचा प्रकल्प तयार करावा, त्यासाठी नगरसेवक निधी देतील, असे सांगितले. नगरसेविका किरण कुलेवार यांच्या मागणीनुसार नाशिकच्या दुर्घटनेतील मृतांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

अंत्यविधीसाठी पैसे

देवपूरमध्ये भूमिगत गटारीचे काम होताना काही ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या, खड्डे जैसे- थे असल्याने नागरिक त्रस्त आहेत. मात्र, महिन्यापासून ठेकेदारासह त्याची यंत्रणा गायब झाल्याचे देवरे म्हणाले. तसेच अंत्यविधीसाठी नातेवाइकांकडून पैसे घेणाऱ्या आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नवले यांनी केली.

loading image
go to top