esakal | संचारबंदीची वाट.. रिकामटेकड्यांना आणले वठणीवर

बोलून बातमी शोधा

dhule lockdown

संचारबंदीची वाट.. रिकामटेकड्यांना आणले वठणीवर

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या, मृत्यूचे प्रमाण पाहता चिंता व्यक्त होत आहे. हीच स्थिती राज्यातही आहे. त्यामुळे सरकारने संचारबंदीसह अत्यावश्‍यक सेवा वगळून लॉकडाउन लागू केले आहे. असे असूनही या नियमांची वाट लावत रिकामटेकडे शहराला धोक्यात टाकत होते. त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत होती. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस प्रशासनाने मंगळवारी (ता. २०) ॲक्शन मोडमध्ये येत विविध भागात कारवाई करत गर्दी, वाहनधारकांना हटविले.

संचारबंदीचे तीन दिवस कुठलाही कायदेशीर धाक दिसत नसल्याने रिकामटेकड्यांना हिंडण्याची पर्वणी ठरली. गरजू रुग्णांचे नातेवाईक वगळता शहरात संचारबंदीलाच रिकामटेकड्यांनी आव्हान दिले. वास्तविक अत्यावश्‍यक व शासकीय कार्यालये वगळता उर्वरित सर्व व्यवहार बंद असतानाही शहरात पाचकंदीलसह ठिकठिकाणी नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत होती. वाहनधारक बिनधास्तपणे हिंडताना दिसून येत होते. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून चिंताग्रस्त राज्य शासन संचारबंदीसह लॉकडाउनचा निर्णय लागू करीत असताना, त्याची कठोरतेने अंमलबजावणी व्हावी, असा आदेश देत होते. त्याची पायमल्ली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी होत होती.

संचारबंदीची प्रचिती

या पार्श्वभूमीवर टीकेचा सूर उमटल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले. ते मंगळवारी सकाळनंतर रस्त्यावर उतरले. ‘ब्रेक द चेन’ मोहिमेची मोडतोड करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचा ते प्रयत्न करताना दिसले. शहरात दुकाने बंद न करणाऱ्यांना दंड आणि पोलिसी लाठीने काहींचा समाचार घेताना दिसले. त्यामुळे मंगळवारी सकाळनंतर पहिल्यांदा शहरात संचारबंदीसह लॉकडाउनची प्रचिती आली. पोलिसांनी बळाचा धाक निर्माण केल्यावर फेरीवाले आणि दुकानदारांची धावपळ सुरू झाली. परिणामी, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड, पाचकंदीलसह प्रमुख मार्गांवर सकाळी अकरानंतर शुकशुकाट दिसून आला.

अधिकारी फौजफाट्यासह

साक्री रोडवरही बहुसंख्य दुकाने उघडी होती. त्यांना पोलिसांनी समज व लाठी उगारत दुकाने बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे साक्री रोडवरील वर्दळ सकाळी अकरानंतर थांबली. रिकामटेकड्यांची विचारपूस, चौकशीतून नाकाबंदी करताना पोलिसांनी काही वर्दळीच्या मार्गांवर बॅरिकेट्स लावत अनावश्‍यक वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, आझादनगरचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी फौजफाट्यासह कारवाई केली. या कारवाईत सातत्य दिसावे आणि शहराला धोक्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा इतर नागरिकांनी व्यक्त केली.