esakal | दोंडाईचा येथे रेमडेसिव्हिरची जादा दराने विक्री; प्रकार आला चव्हाट्यावर

बोलून बातमी शोधा

remdesivir
दोंडाईचा येथे रेमडेसिव्हिरची जादा दराने विक्री; प्रकार आला चव्हाट्यावर
sakal_logo
By
टिम इ सकाळ

दोंडाईचा (धुळे) : रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन चढ्या दराने बाजारात विकले जात असल्याबाबत रामी (ता. शिंदखेडा) येथील प्रशांत प्रवीणसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने खानदेश मेडिकल एजन्सी येथे चौकशीसाठी दाखल झाले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एम. व्ही. देशपांडे, अपर तहसीलदार सुदाम महाजन, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, महसूल विभागाचे गंगेश्वर गवळी, संजय सोनवणे, पोलिस कर्मचारी संदीप कदम, चंद्रकांत साळुंखे, मुकेश अहिरे, संजय गुजराती आदींनी खानदेश मेडिकल एजन्सीच्या ठिकाणी जाऊन चौकशी सुरू केली आहे. गुरूवारी (ता. २२) रात्री उशिरापर्यंत जाबजबाब घेत चौकशीचे कामकाज सुरू होते. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात रेमडेसिव्हिरचा काळाबाजारच्या चर्चेला उधाण आले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्त्यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला आहे.

एजन्सीमधूनच काळाबाजार

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनाचा सुरुवातीपासूनच तुटवडा आहे. तक्रारदार गिरासे यांच्या नातेवाइकांतील एका महिलेला कोरोनाची लागन झालेली होती. त्या महिलेला अर्जंट रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन लागणार होते. येथील खानदेश मेडिकल एजन्सीच्या मालकाचा मुलगा आशिष नावाच्‍या तरुणाकडे रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन आहेत असे मनसे विद्यार्थी सेनेचे शिंदखेडा तालुका संघटक दिग्विजयसिंग राजपूत यांना कळाले. त्यांनी लगेच आशीष यांना फोन केला त्यांनी लगेच काही वेळात रेमडेसिव्हिरसाठी येथील व्यापारी भवनजवळ बोलवून दोन इंजेक्शन पाच हजार किंमती मध्ये दिले. दिग्विजयसिंग राजपूत यांनी घडलेला सविस्तर प्रकार त्यांचे मित्र तक्रारदार प्रशांत गिरासे यांना सांगितला होता. त्‍यामुळे याची चौकशी करून खानदेश मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे यांच्या कडे केली होती. संबंधितावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशांत गिरासे यांनी दिला आहे.