esakal | चाळीसवर्षीय मुख्याध्यापकाचा प्रताप; केला विवाह तोही अल्‍पवयीन मुलीशी

बोलून बातमी शोधा

Child marriage
चाळीसवर्षीय मुख्याध्यापकाचा प्रताप; केला विवाह तोही अल्‍पवयीन मुलीशी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

निजामपूर (धुळे) : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे डोस पाजणाऱ्या एका शिक्षकानेच चक्क बालविवाह करून कायदा पायदळी तुडविल्याचा प्रकार नुकताच माळमाथा परिसरातील हट्टी खुर्द (ता. साक्री) येथे उघडकीस आला. या प्रकरणी ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात शिक्षकासह अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध मंगळवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित शिक्षक फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

धुळे जिल्हा बालकल्याण समितीच्या ९ एप्रिलच्या पत्रानुसार हा गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला. संबंधित आदेश २४ एप्रिलला हट्टी खुर्द येथील ग्रामसेवकास प्राप्त झाला. त्यानुसार मंगळवारी ग्रामसेवक विजय बोराडे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार देवीदास पदमोर (रा. हट्टी खुर्द), अशोक हालगीर व लताबाई हालगीर (दोन्ही रा. उडाणे, ता. धुळे) यांनी तिन्ही संशयितांनी २ मार्चला शेतातच अल्पवयीन मुलीचा गुपचूप विवाह उरकला.

ते तर मुख्याध्यापक तरीही

संबंधित अल्पवयीन मुलीची जन्मतारीख २ एप्रिल २००४ असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ज्याच्याशी विवाह लावून दिला तो संशयित देवीदास पदमोर (वय ४०) हा नंदुरबार तालुक्यातील अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षक असल्याचे व त्याचा यापूर्वी घटस्फोट झाल्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर संबंधित शिक्षकाकडे प्रभारी मुख्याध्यापकपदाचा कार्यभार असल्याचेही समजते. एवढ्या जबाबदारीच्या पदावर असूनही संबंधिताने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह केलाच कसा, याबाबत माळमाथा परिसरातून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. हवालदार संदीप ठाकरे तपास करीत आहेत.