बेरोजगारीची बेडी, जमेना लग्नाची जोडी!

महेंद्र खोंडे
Sunday, 6 December 2020

एकतर मोठ्या प्रमाणात झालेली भ्रूणहत्या व गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील नवऱ्या मुलाला लग्न जमवितांना अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

तऱ्हाडी (धुळे) : दिवाळीनंतर तुलशी विवाह पर्व संपल्यानंतर लगचेच लग्न समारंभ सुरुवात झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्न जुळविण्याचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र साखरपुडा, लग्न जमविणे व जमविलेल्या लग्नाचा बार उडविण्याचे काम काही प्रमाणात सुरु आहे. परंतु मुलींचे प्रमाण हजारांच्या मागे सातशे असे झाल्याने ग्रामीण भागातील नवऱ्याला नवरी मिळेनाशी झाली आहे. 
काही वर्षापासून मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे; त्याचा परिणाम आता सोसावा लागत आहे. आता मुलींचे लग्न अठरा ते वीस वर्ष वय होईपर्यत मुली संगणक, शिलाईकाम, ब्यूटीपार्लर असे कोर्स पूर्ण करुन स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार उपलब्ध करत आहेत. काही मूली तर बीएड, डीएड, डॉक्टर, इंजीनियर, वकील आदी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून त्या नोकरी करतांना दिसतात. तर काही महिलांनी मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळविल्या आहेत. 

हुंडा नको मुलगीच द्या
मुलींच्या घटत्या जन्मदराने आता हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अशी विनवणी करण्याची वेळ मुलावर आली आहे. एकतर मोठ्या प्रमाणात झालेली भ्रूणहत्या व गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील नवऱ्या मुलाला लग्न जमवितांना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. यामुळे लग्ना विना राहण्याची वेळ त्या तरुणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलगी बघायला गेलेल्या मुलाचा बाप दबक्या आवाजात आपल्याला हुंडा नको फक्त मुलगी हवी असे मध्यस्थी माणसांना सांगताना दिसत आहे. ग्रामीण भागातील मुलगी सुद्धा लग्नाची घाई न करता शिक्षणाकड़े लक्ष केंद्रीत करतांना दिसत आहे. बहुसंख्य व्यसनाधीन तरुणांना मुलींनी नाकारल्याने नापसंत करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उपवर मुलांनी एक प्रकाराची धास्तीच घेतली आहे. 

शेतकरी नवरा नको ग बाई
काही वर्षांपूर्वी मुलं आणि मुली यांच्या संख्येमध्ये तफावत असल्याने वयात आलेल्या तरूणांची लग्ने रखडायची. आतादेखील ग्रामीण भागातील तरूणांची लग्न अनिश्चित काळासाठी या कारणामुळे लांबणीवर पडली आहेत. तेव्हा, ग्रामीण भागातील मुलींनी तो सुशिक्षित असला तरी केवळ शेतकरी आहे म्हणून मुलांनाय नाकारण्याचा हा प्रकार खरंच बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची केवळ एक झलक दाखवणारा आहे.

गाठली तिसी तरी लग्न जमेना
दरवर्षी ज्योतिष्यांकडे जाऊन या वर्षी तरी योग आहे का, हे विचारण्याचा धडाका सुरूच आहे वर्षानुवर्षे त्यात वय वाढतंच चाललय तिशीला वय पोचल काहिच तरि आपल्या वयाची मुलगी मिळेना. आणि मुला-मुलीत जास्त अंतर असेल तर लग्न जमेलच कसं असं करत करत आज प्रत्येक गावात 40 ते 50 नवरदेव बाशिंग घेऊन तयार आहेत पण मुली काही मिळायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule no job in market and marriage problem