esakal | परिवाराकडे पाहून मरताही येत नाही; कोण म्‍हणतय असं?
sakal

बोलून बातमी शोधा

non granted school teacher

विनाअनुदानित शाळांना अनुदान वितरणाचा शासन निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत न झाल्यास शिक्षकदिनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे राज्यातील सुमारे २० हजार विना-अनुदानित शिक्षकांसह पश्चाताप व मातम आंदोलन केले जाणार आहे.

परिवाराकडे पाहून मरताही येत नाही; कोण म्‍हणतय असं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनगीर  डीएड - बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि पायावर कुऱ्हाड मारून घेतली. शिक्षक होऊन पश्चाताप होत असून गेल्या १८ ते २० वर्षांपासून विनावेतन काम करीत असून अन्य क्षेत्रात नोकरीचे वय देखील निघून गेले आहे. अनेक मित्रांनी कंटाळून आत्महत्या देखील केल्या. आता आम्ही काय करावे, शासन जगू देत नाही आणि परिवाराकडे पाहून मरताही येत नाही... अशी प्रतिक्रिया विनाअनुदानित शाळेत विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांनी दिल्या. 
विनाअनुदानित शाळांना अनुदान वितरणाचा शासन निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत न झाल्यास शिक्षकदिनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे राज्यातील सुमारे २० हजार विना-अनुदानित शिक्षकांसह पश्चाताप व मातम आंदोलन केले जाणार आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर, मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या बंगला, मंत्रालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. यात सामुहिक आक्रोश केला जाईल.
 
या आहेत मागण्या
राज्यातील राहिलेल्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या निधीसह घोषित करणे, १३ सप्टेंबर २०१९ ला अनुदान घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना निधी वितरणाचे परिपत्रक काढून प्रत्यक्ष अनुदान देणे. वीस टक्के अनुदान प्राप्त शिक्षकांना पुढील ४० टक्के अनुदानाचा टप्पा देणे, विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणे आदी शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत. 

फाईल पडलीय धुळखात
हजारो शिक्षक गेल्या १५ ते २० वर्षांपासून विनाअनुदानित शाळांमध्ये कोणत्याही मोबदल्याविना ज्ञानदानाचे काम करीत असून आज ना उद्या आपल्याला पगार मिळेल या भाबड्या आशेवर जगत आहेत. परंतु शासनाला त्यांची दया येत नाही. पगारासाठी या शिक्षकांनी आतापर्यंत सुमारे ३०० आंदोलने केली; परंतु प्रत्येक वेळी केवळ आश्वासनावरच बोळवण करण्यात आली. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी १३ सप्टेंबर २०१९ ला यापैकी काही शाळांना अनुदान घोषित केले होते. परंतु प्रत्यक्ष अनुदान मिळण्यासाठी अद्यापही ती फाईल एक वर्षांपासून वित्त मंत्रालयात कोणत्याही निर्णयाविना धूळ खात पडली आहे. दरम्यान आर्थिक विवंचनेतुन अनेक शिक्षकांनी एकतर आत्महत्या केल्या किंवा त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. कोरोनाच्या संकटात अशा शिक्षकांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यांना मदत करण्याऐवजी शासन राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्याचे कारण पुढे करून शिक्षकांना त्यांचा हक्काचा पगार नाकारत आहे. या शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षक पश्चाताप व मातम आंदोलन करतील. अशी माहिती महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांनी दिली आहे. दरम्यान आंदोलनाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वित्तमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. 


 

loading image
go to top