कृषी विधेयक विरोध ट्रॅक्टर रॅलीसाठी राहुल गांधींना आमंत्रण 

निखील सुर्यवंशी
Wednesday, 28 October 2020

शिंदखेडा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती व पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने आपदग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेजद्वारे आर्थिक भरपाई मिळावी.

धुळे ः केंद्राकडून मंजूर तीन कृषी विधेयकांना राज्यातील सत्ताधारी काँग्रेसकडून कडाडून विरोध होत आहे. त्यासाठी देशासह जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. तसेच लक्षवेधी आंदोलनातून विरोध ठासविला जात आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीस नेते, खासदार राहुल गांधी यांना आमंत्रित करण्याचा ठराव शिंदखेडा येथे झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत करण्यात आला. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे १ ते १० नोव्हेंबरपर्यंत केंद्र शासनाच्या कृषी विधेयक व कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन आहे. तसे पक्षाच्या प्रत्येक तालुकास्तरीय कार्यकारिणीला सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुका काँग्रेसची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर अध्यक्षस्थानी होते. तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीस खासदार गांधी, राज्य प्रभारी एच. के. पाटील, अहमद पटेल, मुकुल वासनिक, सचिन पायलट, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आमदार कुणाल पाटील आदी नेत्यांना आमंत्रित करण्याचा ठराव पारीत झाला. 

बैठकीत शिंदखेडा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती व पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने आपदग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेजद्वारे आर्थिक भरपाई मिळावी, सोनवद प्रकल्प, वाडी शेवाडी प्रकल्प, अमरावती धरणाच्या डावा व उजवा कालव्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, याबाबत ठराव झाला. तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, पांडुरंग माळी, विकास पवार, डॉ. जे. पी. बोरसे, डॉ. प्रशांत बागूल, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, चंद्रकांत सोनवणे, प्रा. विशाल पवार, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम पाटील, श्‍यामकांत पाटील, प्रमोद बोरसे, शानाभाऊ पाटील, सचिन सोनवणे, आबा मुंडे, महेंद्र पाटील, पंजाबराव सोनवणे, उमेश पवार, राकेश गिरासे, चंद्रकांत शिरसाठ, आशिष बागूल, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम, राकेश राजपूत, देवेंद्र ठाकरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule nvitation by Rahul Gandhi for tractor rally against agriculture bill