esakal | ऑक्सिजन सिलिंडरच संपल्याने तीन जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

दोंडाईचाला ऑक्सिजन सिलिंडरच संपल्याने तीन जणांचा मृत्यू !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


चिमठाणे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील (Sub-District Hospital) कक्षात कोरोना (corona) संसर्गाचे सरासरी १८ रूग्ण (Patient) ऑक्सिजनवर (Oxygen) होते. त्यात मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने तीन जणांचा मृत्यू (death) झाल्याची धक्कादायक घटना घडली. रात्र पाळीला एकटी महिला कर्मचारी होती. उपजिल्हा रुग्णालयाकडून या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून पुरेपुर काळजी घेतली गेली. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना सकाळी बोलावून रुग्णालयाने ही माहिती दिली.

(oxygen cylinders end three patient died dondaicha sub district hospital)

हेही वाचा: दिलासादायक ! जळगावची पॉझिटिव्हिटी राज्यात सर्वांत कमी

शिंदखेडा तालुक्यात मार्च व एप्रिलमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे तालुक्यातील दोंडाईचास्थित एकमेव उपजिल्हा रुग्णालयावर भार आला. अशात गुरुवारी उपजिल्हा रूग्णालयात मेडिकल ऑक्सिजनयुक्त बेडवर १८ रूग्ण उपचार घेत होते. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास अलार्म बंद असल्याने सेवेतील महिला कर्मचाऱ्याला ऑक्सिजन सिलिंडर संपल्याचे समजले नाही. काही रुग्णांना कमी प्रमाणावर ऑक्सिजन मिळत असल्याचे लक्षात आल्यावर ही स्थिती त्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणली. नंतर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात आला.

सखोल चौकशीची मागणी
या कालावधीपर्यंत शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील ६७ वर्षीय, तावखेडा येथील ५० वर्षीय आणि दोंडाईचा येथील ५२ वर्षीय रूग्ण गतप्राण झाले. आरोग्य यंत्रणेला शुक्रवारी (ता.७) सकाळी ही घटना समजल्यानंतर मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना ही माहिती दिली. देगाव येथील मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकावर देगाव येथे शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार झाले. तावखेडा व दोंडाईचा येथील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींवर दोंडाईचा येथे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार केले. या घटनेप्रकरणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: चांगली बातमी..एक वर्षाचा बालक २३ दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर

रात्र पाळीला महिला कर्मचारी कशी?
दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात रात्र पाळीला महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाते. ऑक्सिजन सिलिंडर संपले तर संबंधित कर्मचाऱ्याला ते बदलावे लागते. जम्बो सिलिंडरचे वजन सरासरी ४७ ते ५२ किलो असते. अशा वेळी एकट्या महिला कर्मचाऱ्याला इतक्या वजनाचे सिलिंडर कसे बदलता येईल? रात्री- अपरात्री सिलिंडर संपल्यास गुरुवारसारखा अनुचित प्रकार पुढे घडू नये म्हणून रात्र पाळीला पुरुष कर्मचारीच्या नियुक्तीची गरज व्यक्त होत आहे.

गंभीर प्रकृतीमुळे रुग्णांचा मृत्यू : डॉ. भडांगे
या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे म्हणाले, की दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोनला ऑक्सिजन सिलिंडर संपले होते. एका वॉर्डातून दुसऱ्या वार्डात सिलिंडर आणण्यास संबंधित कर्मचाऱ्याला थोडा कालावधी लागला. तत्पूर्वी, अतिदक्षता विभागाच्या डॉक्टरांनी गुरुवारी रात्री नऊला तपासणीवेळी दोन रुग्णांबाबत गंभीर स्थितीची माहिती त्यांच्या नातेवाइकांना दिली. त्यांना दुसऱ्या रूग्णालयात न्यावे, व्हेंटीलेटरची गरज भासेल याची पूर्वकल्पना दिली होती. मात्र, संबंधित नातेवाइकांनी आमच्या रुग्णांवर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातच उपचार करावा, असे सांगितले. त्याप्रमाणे उपचार सुरू असताना एका रुग्णाचा शुक्रवारी पहाटे चारला, तर दुसऱ्या रुग्णाचा सकाळी सहाला मृत्यू झाला. तरीही या प्रकरणी चौकशी केली जाईल.

(oxygen cylinders end three patient died dondaicha sub district hospital)