
धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या संकल्पनेतून व गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दंडगव्हाळ यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम सुरू होत आहे.
देऊर (धुळे) : कोरोना परिस्थितीत शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमातर्गंत धुळे पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातर्फे "शिक्षणगंगा धुळे रेडिओ चॅनेल" प्रायोगिक तत्त्वावर आजपासून सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राज्य पातळीवरून व शिक्षक स्वकल्पकतेतून शाळा स्तरावर राबवित आहे. त्यातूनच हा एक उपक्रम उदयास आला आहे.
धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या संकल्पनेतून व गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दंडगव्हाळ यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम सुरू होत आहे. विद्यार्थी व पाल्य यांचे शिक्षण अविरत आनंददायी राहावे. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. यासाठी https://bit.ly/3f9ZNX7 रेडिओ लिंकअॅपवर डाऊनलोड करता येणार आहे. लवकरच ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येईल.
पुनःप्रसारण अन् पॉडकास्ट सिरीज
शैक्षणिक कार्यक्रम इंटरनेट रेडिओ दिवसातून दोन वेळा प्रसारित होणार आहे. दररोज सकाळी 8 ते 9 या वेळेत थेट प्रसारण व सायंकाळी 6 ते 7 या वेळेत पुनः प्रसारण केले जाणार आहे. या दोन्ही वेळेत ज्यांना कार्यक्रम ऐकणे शक्य होणार नाही. त्यासाठी सर्व कार्यक्रमाच्या ऑडियो फाईल्स पॉडकास्ट सिरीजचा स्वरूपात ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हवे तेव्हा याचा लाभ घेता येणार आहे. फेसबुक पेज, ट्विटर आणि इंस्टाग्राम, हॅशटॅग, व्हॉट्सॲप संदेश सोशल मिडिया माध्यमांचा उपयोग सर्व शिक्षकांनी अधिकाधिक विद्यार्थी पालकांना रेडिओ चॅनेलचा लाभ घेता येणार आहे.
शिक्षकांनी स्वतः तयार केले कार्यक्रम
कार्यक्रमाच्या सूचना, प्रतिक्रिया, आवश्यक तांत्रिक सहाय्यसाठी बीट शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा. या इंटरनेट रेडिओ चॅनेलची निर्मिती, तंत्र सहाय्य डायटचे आयटी विषय सहाय्यक प्रणव पाटील, सरवड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तुषार महाले यांनी केली आहे. प्रसारित करण्यात येणारे शैक्षणिक कार्यक्रम शिक्षकांनी स्वतः तयार केले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी रेडिओ शिक्षणगंगा धुळे अभिनव उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
"शिक्षणगंगा धुळे या उपक्रमाद्वारे गाणी, बोधपर गोष्टी, पाढे, इंग्रजी मराठी कविता, धडे, शिवरायांच्या जीवनातील प्रसंग, गप्पा, अनुभव असे अनेकविध शैक्षणिक घटकांची शृंखला आहे. अध्ययन घटक शिक्षकनिर्मित व काही इंटरनेट वर पुनः वापरासाठी उपलब्ध साहित्यातील आहेत. शिक्षकांनी शैक्षणिक घटक ईमेल वर पाठवावे."
– सुरेखा देवरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, धुळे
सोशल मिडीयावरही
फेसबुक पेज : रेडिओ शिक्षणगंगा धुळे
इंस्टाग्राम: RadioShikshangangaDhule
ट्विटर: @RadioShikshangangaDhule
संपर्कासाठी ईमेल: radioshikshangangadhule@gmail.com
संपादन ः राजेश सोनवणे