केंद्र सरकारचे कायदे, धोरणे त्रास देणारेच : ॲड. पद्माकर वळवी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

भाजपने लोकांच्या फायद्याचे कायदे बंद करून स्वतःच्या फायद्याचे कायदे सुरू केले आहेत. शेतकरी व सामान्य कामगार संपविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला असून, कंपन्यांचे राज्य सर्वदूर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत

मंदाणे (धुळे) : केंद्र सरकारने तयार केलेले नवनवीन कायदे व धोरणे सामान्य जनतेची दिशाभूल करणारे असून, शेतकरी आणि गोरगरीब कामगारांना संपविणारे आहेत, असे मत माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी येथे व्यक्त केले. 
येथे काँग्रेसच्या मंदाणे व असलोद जिल्हा परिषद गट व गणातील कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, काँग्रेसचे शहादा तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, माजी अध्यक्ष दिलीप गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले, पंचायत समिती सदस्य गोपी पावरा, माजी पंचायत समिती अध्यक्षा वनीता पटले, माजी पंचायत समिती सदस्य लगन पावरा, काळूसिंग पावरा, स्वीय सहाय्यक गणेश पाटील, अनिल कुवर, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, दिनेश पवार, भोंगरा येथील सत्तरआप्पा पावरा, ज्‍येष्ठ कार्यकर्ते ओंकार पाटील आदी उपस्थित होते. 
माजी मंत्री वळवी म्हणाले, की भाजपने लोकांच्या फायद्याचे कायदे बंद करून स्वतःच्या फायद्याचे कायदे सुरू केले आहेत. शेतकरी व सामान्य कामगार संपविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला असून, कंपन्यांचे राज्य सर्वदूर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कितीही राजकीय घडामोडी होवोत. कुणी कोणत्याही पक्षात जावोत, आपला एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे काँग्रेस. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट राहणे अत्‍यंत गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. चुनीलाल ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule pdmakar walvi statement center goverment