माणुसकी : रस्‍त्‍यावर भिकाऱ्याचा मृतदेह...उचलून केले अंत्‍यसंस्‍कार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

पिंपळनेर येथील पानथळ भिलाटीमधील सात ते आठ वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या भिकाऱ्याचा सोमवारी (ता. 20) दुपारी तीन वाजता मृत्यू झाला.

पिंपळनेर : कोरोनाच्या काळात सर्वत्र भितीचे वातावरण असताना, पिंपळनेर येथील एका बेवारस भिकाऱ्याच्या मृतदेहाचे अंत्यविधी पिंपळनेर येथील पोलिस यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने झाला. 
पिंपळनेर येथील पानथळ भिलाटीमधील सात ते आठ वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या भिकाऱ्याचा सोमवारी (ता. 20) दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे व कन्हैयालाल माळी यांना याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांना पाचारण करण्यात आले. सदर मृत व्यक्ती पिंपळनेर येथे वास्तव्यास होता भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवलेला होता. पोलिसांनी चौकशी केली असता शहाद्यातील (जि. नंदुरबार) कुडावेल येथील मूळ रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते. 

वारस नाही
सदर मृतदेह घेण्यास कोणताही वारस पुढे न आल्याने पिंपळनेर पोलिसांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, कहैय्यालाल माळी, विनायक पिंपळस, नेताजी महेश राजपूत, गौरव अमरधाममधील ग्रामपंचायत शिपाई, समर्पण सेवाभावी संस्था, धनराज जैन या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सदर प्रेताचे निर्जंतुकीकरण करून हिंदू शास्त्राप्रमाणे अंत्यविधी पिंपळनेर येथील अमरधाम येथे करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule pimpalner bhikari death road and funeral people