हे वाचनालय आहे टिळकांचा ठेवा...शंभर वर्ष पुर्ण

भरत बागुल
Saturday, 1 August 2020

टिळकांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे स्वप्न सत्यात व्हावे यासाठी मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे वाचण्याचा खटाटोप तरुणांना होता याच माध्यमातून या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली होती. ग्रंथालय आज शंभर वर्ष पूर्ण करीत असल्याने सुरुवातीपासून ग्रंथालय आजही त्याच जागेवर आहे.

पिंपळनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञानार्जनाचा पाझर सतत पुढे वाहणारी गंगा म्हणजे येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाला थोरराष्ट्र पुरुषांनी भेट देऊन आपला अभिप्राय दिला आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून दररोज जी सेवा प्रदान केली जात आहे तिला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. 

लोकमान्य टिळकांनी काढलेला केसरी व मराठा वाचून जनतेत स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत होण्यासाठी येथील आयुर्वेदाचार्य स्व. वेणी माधव जोशी, रामदास वैद्य, बाबा सटवा बोळे, माधवराव बळवंतराव देशमुख, विनायक नाटेश्वर जोशी अशा ज्ञानवंतांनी लोकमान्य टिळकांचा प्रथम स्मृतिदिनी सन एक ऑगस्ट १९२१ साली येथील आयुर्वेदाचार्य वेणी माधव जोशी पाच मित्रांना एकत्र आणून लोकमान्य टिळक ग्रंथालयाची स्थापना केली. आज देखील या ग्रंथालयाचे काम उत्तम प्रकारे चालू आहे. टिळकांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे स्वप्न सत्यात व्हावे यासाठी मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे वाचण्याचा खटाटोप तरुणांना होता याच माध्यमातून या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली होती. ग्रंथालय आज शंभर वर्ष पूर्ण करीत असल्याने सुरुवातीपासून ग्रंथालय आजही त्याच जागेवर आहे. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या माहितीवरून असे समजते की १९४० साली तत्कालीन धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ईश्वरन हे स्वतंत्रसैनिक सावरकर यांच्या मागावर पिंपळनेर आले असता ग्रंथालयाच्या कमिटीने त्यांच्याकडे जागेची मागणी केली आणि कलेक्टर साहेबांनी तत्काळ जागा उपलब्ध करून दिली व आज त्याच जागेवर स्वतःची इमारत आहे. या ज्ञान गंगेला राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वा.सावरकर, विनोबा भावे, दादा धर्माधिकारी, चंद्रकांत वर्तक, भाऊसाहेब हिरे यासह ग्रंथालयात असलेले शेरेबुक या ग्रंथालयाचा खजिना आहे. या शेरे बुक मध्ये साहित्यिक न. चि. केळकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, चि. व. जोशी, अनेक थोर पुरुषांचे स्वहस्ताक्षरात शेरे बुक मध्ये अभिप्राय वाचण्यास मिळतो. 
 
क्रांतीकारी विचारांनी ग्रंथालयाचे लावलेले रोपटं वाढवविण्याचे काम सुरू आहे. जुन्या लोकांच्या आशीर्वादाने ग्रंथालयाची ग्रंथसंपदा २२ हजार झाली आहे. त्यात अनेक धार्मिक, सामाजिक, हिंदू धर्माचेच नाही तर ख्रिश्चन, मुस्लिम धर्मियांचे सुद्धा पुस्तके आहेत. कोणीही यावे आणि ग्रंथसंपदेतून ज्ञान वाढवावे. यासाठी आमचे प्रयत्‍न सुरू आहेत. वाचनाची ही चळवळ यापुढेही अधिक समृध्द करण्याचा आमचा मानस आहे. 
-मकरंद नारायण वैद्य, अध्यक्ष, लोकमान्य टिळक ग्रंथालय पिंपळनेर.

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule pimpalner lokmanya tilak Reading room hundred year