बहिणीला भेटण्याची "त्या'ची इच्छा अपूर्णच! 

dhule accident
dhule accident

पिंपळनेर : "फायरमन' म्हणून कार्यरत तरुण आई- वडिलांसह कुटुंबीयांना भेटण्यासाठी मोठ्या अपेक्षेने गावी आला. गावी सगळ्यांची भेट घेतल्यानंतर येथील बहिणीला भेटण्यासाठी स्कूटीने निघाला. मात्र, रस्त्यातच त्याच्यावर काळाने घाला घातला. सागवानी लाकूड वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकने तरुणाच्या स्कूटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची बहिणीला भेटण्याची इच्छा अपुरीच राहिली. या अपघाताने हारपाडा (ता. साक्री) गावावर शोककळा पसरली. 
कळवा (ता. पालघर) येथे वास्तव्यास असलेल्या व मिरा-भाईंदर महापालिकेतील अग्निशामक दलात फायरमन म्हणून कार्यरत मिथुन बाळू पवार (वय 31) काल (ता. 5) सायंकाळी आपल्या आई- वडिलांना भेटण्यासाठी हारपाडा या आपल्या गावी आला होता. काल सगळ्यांची भेट घेत त्याने कुटुंबीयांसमवेत जेवण घेतले व मनसोक्त संवाद साधला. आज सकाळी बहीण शीतलला भेटण्यासाठी म्हणून मिथुन हारपाड्याहून स्कूटीने पिंपळनेर येथे निघाला. 

आई- वडीलांसोबत घेतले शेवटचे जेवणे 

पिंपळनेरहून गुजरातकडे सागवान लाकूड घेऊन जाणारा आयशर ट्रक (जीजे19/एक्‍स8383) आज सकाळी साडेआठच्या सुमारास पानखेडा (ता. साक्री) येथील चिंचपाडा फाट्याजवळ आला असता समोरून येणाऱ्या मिथुनच्या स्कूटीला (एमएच48/बीबी1857) वळणावर आयशरने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता, की धडकेनंतर लाकडांचा ट्रक थेट झाडावर जाऊन आदळला. यात स्कूटीही फरफटत नेली. स्कूटीचे अक्षरशः तुकडे झाले. यात मिथुन पवारचा जागीच मृत्यू झाला, तर आयशरचालक राजेंद्र अमृत पाटील (वय 21, रा. धार मालपूर, ता. अमळनेर) याचे दोन्ही हात, पाय फ्रॅक्‍चर झाले. सहचालक विजय मोहन राठोड (वय 25, रा. गुजरात) हा गंभीर जखमी झाला. जखमींना धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. 

मृतदेह पाहून आक्रोश
हारपाडा येथील दूध विक्रेत्याने मिथुनचा भाऊ अनिल पवारला अपघाताची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांसह नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. अपघातात मिथुनचा मृतदेह अक्षरशः छिन्न-विछिन्न झाला होता. तो पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अनिल पवारने येथील पोलिस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मिथुनचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक नुक्ते यांनी आज दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. हवालदार युवराज पवार तपास करीत आहेत. 


हारपाडा येथे अंत्यसंस्कार 
अत्यंत शोकाकुल वातावरणात आज दुपारी मिथुनवर हारपाडा येथे अंत्यसंस्कार झाले. घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. मिथुनच्या मागे आई, वडील, तीन भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com