esakal | ‘रिपोर्ट’ची घाई असलेल्यांसाठी धुळ्यात खासगी लॅबची सुविधा 
sakal

बोलून बातमी शोधा

‘रिपोर्ट’ची घाई असलेल्यांसाठी धुळ्यात खासगी लॅबची सुविधा 

येथील कोरोना टेस्टिंग लॅबवर सुरवातीला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगावसह धुळे जिल्ह्याचा भार होता. तो टप्प्याटप्प्याने कमी होत गेला. सद्यःस्थितीत धुळे व नंदुरबार, तसेच मालेगाव येथील काही तपासण्यांचा भार या लॅबवर आहे

‘रिपोर्ट’ची घाई असलेल्यांसाठी धुळ्यात खासगी लॅबची सुविधा 

sakal_logo
By
निखील सूर्यवंशी

धुळे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, नमुने तपासणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकमेव कोरोना टेस्टिंग लॅबवर भार असतो. तो कमी करण्यासाठी शासनाने ‘आयसीएमआर’च्या निकषांनुसार पुणेस्थित खासगी लॅबला धुळ्यात नमुने स्वीकारण्यासह अहवाल देण्यास परवानगी दिली आहे. शिवाय आणखी दोन खासगी लॅबशी कराराचा प्रयत्न सुरू आहे. 


येथील कोरोना टेस्टिंग लॅबवर सुरवातीला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगावसह धुळे जिल्ह्याचा भार होता. तो टप्प्याटप्प्याने कमी होत गेला. सद्यःस्थितीत धुळे व नंदुरबार, तसेच मालेगाव येथील काही तपासण्यांचा भार या लॅबवर आहे. त्यात लॅबमधील दोघा डॉक्टरांसह आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे नमुने तपासणीसह अहवालाची प्रक्रिया संथ झाली. ती दोन दिवसांपासून सुरळीत झाली आहे. कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये नमुने तपासणीस गेल्यानंतर अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा अवधी लागतो. मात्र, अनेक जणांना दुसऱ्या दिवशी अहवाल मिळावा, अशी अपेक्षा असते. त्यानुसार शासनाने पुणेस्थित खासगी लॅबला येथील नमुने तपासणी व अहवाल जाहीर करण्यास परवानगी दिली आहे.

एका व्यक्तीस सरासरी दोन हजार ८०० रुपयांचा खर्च येतो. हा दर शासनाने ठरवून दिला आहे. खासगी लॅबचे स्वॅब कलेक्शन सेंटर खोलगल्ली परिसरात आहे. कुणाला संशयामुळे नमुने तपासणी करून घ्यावीशी वाटते, ते शासनाच्या नियमात बसत नाही. त्यांना खासगी लॅबमध्ये ही तपासणी करता येऊ शकेल. खासगी लॅबकडून येणाऱ्या अहवालांची माहिती रोज हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय यंत्रणेला दिली जाते. शिवाय नाशिक येथील खासगी लॅबशी कराराचा प्रयत्न सुरू आहे. या सुविधेमुळे शासकीय लॅबवरील भार कमी झाला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे