esakal | रमाई आवास योजनेचा कोटा वाढला, आता गरज लाभार्थ्यांची! 
sakal

बोलून बातमी शोधा

रमाई आवास योजनेचा कोटा वाढला, आता गरज लाभार्थ्यांची! 

. योजनेंतर्गत २०१७-२०१८ मध्ये ५४ घरांसाठी प्रशासकीय मंजुरी होती, त्यातील ४८ लाभार्थ्यांना अनुदान वितरित झाले.

रमाई आवास योजनेचा कोटा वाढला, आता गरज लाभार्थ्यांची! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे  ः राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत २०१९-२०२० साठी तब्बल ९९५ लाभार्थ्यांना लाभासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच्या दोन वर्षाच्या तुलनेने प्रशासकीय मंजुरीचे हे प्रमाण १८ पटींनी जास्त आहे. या योजनेच्या लाभासाठी आता पात्र लाभार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 

रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. शहरी भागात महापालिका व सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून लाभ दिला जातो. योजनेंतर्गत २०१७-२०१८ मध्ये ५४ घरांसाठी प्रशासकीय मंजुरी होती, त्यातील ४८ लाभार्थ्यांना अनुदान वितरित झाले. २०१८-१९ मध्ये ५० लाभार्थ्यांसाठी मान्यता होती, त्यातील ३४ लाभार्थ्यांना अनुदान वितरित झाले आहे. 
 

कोटा वाढला 
योजनेंतर्गत ९९५ लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. यात २०१७- २०१८ व २०१८-२०१९ च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. महापालिकेने आतापर्यंत २५२ लाभार्थी निश्‍चित करून प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकेने रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना मदतीसाठी सेवाभावी संस्थेच्या नेमणुकीची प्रक्रीयाही सुरू केली आहे. 
 

घरांना नवीन कर आकारणी 
रमाई आवास योजनेंतर्गत बांधकाम पूर्ण झालेल्या घरांना नव्याने मालमत्ता कर आकारणी करण्यात येते. २०१७-२०१८ मधील ४८ पैकी ४० लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, आठ घरे स्लॅब लेव्हलपर्यंत आली आहेत. पूर्ण झालेल्या ४० घरांना नव्याने कर आकारणी (घरपट्टी) करण्यासाठी बांधकाम विभागाने मालमत्ता कर विभागाकडे यादी सादर केली आहे. कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना घराचे वापर प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती मनपातील ओव्हरसियर हेमंत पावटे यांनी दिली. 

अनुदानाचे हप्ते असे - 
- पहिला हप्ता...एक लाख २५ हजार 
- दुसरा हप्ता....एक लाख 
- तिसरा हप्ता...२५ हजार रुपये 

२०१७-२०१८ 
-एकूण ५४ घरांसाठी मान्यता 
-५० लाभार्थ्यांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केले 
-४८ लाभार्थ्यांना अनुदानाचे दोन हप्ते वितरित 
-दोन लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित 
-४० लाभार्थ्यांची बांधकामे पूर्ण, 
- आठ बांधकामे स्लॅब लेव्हलपर्यंत 

२०१८-१९ 
एकूण ५० घरांसाठी मान्यता 
-सात लाभार्थ्यांचे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज 
-बांधकाम सुरू केलेल्या पाच लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित 
-दोन लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित 
-नव्याने सादर २७ अर्जदार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित 

२०१९-२० 
-एकूण ९९५ घरांसाठी मंजुरी 
- २५२ लाभार्थी आत्तापर्यंत निश्‍चित 
- ५ ते ६ लाभार्थ्यांचे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज 
- प्राप्त निधी १० कोटी 

२०२०-२१ साठी १०० लाभार्थ्यांना लाभाचे नियोजन 
 

संपादन- भूषण श्रीखंडे