esakal | सुळेंच्या भूमिकेमुळे "राष्ट्रवादी'चीच गोची! 
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule anil gote amrish patel

सुळेंच्या भूमिकेमुळे "राष्ट्रवादी'चीच गोची! 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची खानदेशात पडझड झाल्यानंतर आणि वेगळ्या राजकीय समीकरणामुळे सत्तेत आल्यावर या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे शनिवारी धावत्या धुळे दौऱ्यावर होत्या. शाहू नाट्यमंदिरातील पक्षीय मेळाव्यात त्या भाजपवासी झालेले माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांचा उदोउदो करून गेल्या. त्यांच्या पक्षांतरामुळे दुःख, वेदना झाल्याचे खासदार सुळे बोलून गेल्या खऱ्या, पण नंतर येथे "गोची' झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. 

अमरिशभाईंचे महत्त्व वाढले 
जिल्ह्यात अनेकांचे राजकारण अमरिशभाईंना केलेल्या विरोधातूनच जिवंत राहिले. राजकारणावर आणि जिल्ह्यावर पकड ठेवायची असेल तर धूर्त, मुरब्बीपणा, कर्तबगारी दाखवावी लागते. त्या कसोटीला अमरिशभाई उतरले. शिरपूरचे असो की इतर विरोधक, काहींनी उघडपणे, तर काहींनी मागच्या दाराने अनुभवी अमरिशभाईंशी जुळवून घेतले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचे केंद्रबिंदू अमरिशभाई ठरल्याचे सर्वांनी पाहिले. पक्ष कुठलाही असो अमरिशभाई "किंगमेकर' आहेत, यावर विविध घडामोडींनीही शिक्कामोर्तब केला. त्यातच खासदार सुळे यांनीही उदोउदो केल्याने अमरिशभाईंचे भाजपमधील राजकीय महत्त्व, वजन अधिक वाढले असून "राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांची मात्र गोची झाल्याचे चित्र आहे. 
 
गोटे, ठाकूर यांचा लढा 
राजकीय पटलावर भाजपचे माजी आमदार आणि पक्षांतरानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, भाजप सोडून "राष्ट्रवादी'त गेलेले डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा अमरिशभाईंविरुद्धचा राजकीय लढाही सर्वश्रुत आहे. वाटचालीत कायम शरद पवार यांच्यावर आरोप, टीका करणारे, तसेच भ्रष्ट "राष्ट्रवादी- शेना', अशी हेटाळणी करणारे माजी आमदार गोटे आता "राष्ट्रवादी'सह राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेचा घटक ठरल्याने धुळेकरांना त्याचे आश्‍चर्य आहेच. 

नव्या वादाला फुटले तोंड 
असे असताना "राष्ट्रवादी'च्या खासदार सुळे यांनी अमरिशभाईंविषयी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे स्थानिक पक्ष पातळीवर नाराजीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट भूमिका जाहीर झाल्याशिवाय काम करणार नाही, असा पवित्रा घेण्याच्या तयारीत नाराज गट आहे. खासदार सुळे यांच्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 
 
खासदार सुळे काय म्हणाल्या? 
कौटुंबिक संबंध आणि कॉंग्रेसच्या विचारधारेत वाढलेला अमरिशभाई पटेल यांच्यासारखा हक्काचा माणूस तिकडे (भाजप) का गेला, याचे दुःख आणि वेदना आहे. यासंदर्भातील कारणे, अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेणार असून, त्यांच्या मनात आता काय?, अशी विचारणा करणार असल्याचे खासदार सुळे यांनी जाहीरपणे सांगितले. त्या मुंबईला परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी "राष्ट्रवादी'त येथे खदखद सुरू झाली. 

काय झाले आरोप? 
भाजपवासी झालेले "राष्ट्रवादी'चे पूर्वाश्रमीचे नेते राजवर्धन कदमबांडे हे अमरिशभाईंच्या गळ्यातील ताईत मानले जातात. त्यामुळे कॉंग्रेसवासी असताना अमरिशभाईंच्या वर्चस्वातील शिरपूर, साक्रीमध्ये "राष्ट्रवादी' बळकट होऊ शकली नाही, असा कायम आरोप झाला. देशमुख गटाचा काळ वगळला तर शिंदखेडा तालुक्‍यातही "राष्ट्रवादी' परिणामकारक ठरली नाही. 

कार्यकर्त्यांपुढील प्रश्‍न 
यंदा विधानसभा निवडणुकीत पक्षीय कार्यकर्त्यांचे पाठबळ न मिळाल्याने माझा व संदीप बेडसे यांचा पराभव झाल्याचे श्री. गोटे यांनी खासदार सुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यात सुळे यांनी मेळाव्यात अमरिशभाईंचा उदोउदो केल्याने, त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने अमरिशभाईंना पुढे विरोध कसा करायचा, त्या शिवाय आपला पक्ष कसा विस्तारेल, कसा बळकट होईल, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. 
 
"राष्ट्रवादी'त दोन गट... 

खासदार सुळे परतल्यानंतर जिल्ह्यातील वेगवान घडामोडीत पवार, सुळे समर्थक आणि उमेदवारीच्या अपेक्षेने "राष्ट्रवादी'त दाखल कार्यकर्ते, असे दोन गट निर्माण झाल्याचे बोलले जाते. या स्थितीत श्री. गोटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल. 

loading image
go to top