esakal | गहू, तांदुळ द्या अन्‌ घेवून जा हवे ते; दिवाळीमुळे मिळतोय फराळ
sakal

बोलून बातमी शोधा

retion card rice and wheat

कोरोनात कामधंदा नसल्याने गरीब कुटुंबांना तांदूळ व गहू तर मिळाले; पण तेल, मीठ, मिरची, डाळी, मसाले, चहा, साखर आदी आणायचे कुठून?

गहू, तांदुळ द्या अन्‌ घेवून जा हवे ते; दिवाळीमुळे मिळतोय फराळ

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : रेशन दुकानातून गोरगरीब कुटुंबांना स्वस्तात गहू व तांदूळ मिळते. बऱ्याच कुटुंबांचे महिनाभर वापरूनही गहू व तांदूळ मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत आहे. ते धान्य घेण्याचा व्यवसाय बहरला असून त्याबदल्यात दिवाळीचा फराळ किंवा अन्य वस्तू दिले जात आहे. शंभराहून अधिक युवक या व्यवसायात उतरले असून गावोगावी तांदूळ, गहू, मका, डाळ घेण्यात चढाओढ सुरू झाली आहे. कापडणेसह परिसरातील युवकांनी हा नवीन व्यवसाय शोधून काढला आहे. 

रेशनवर एका व्यक्तीस दरमहा प्रति किलो तीन रुपये प्रमाणे दोन किलो तांदूळ व प्रति किलो दोन रुपये प्रमाणे तीन किलो गहू मिळतात. याशिवाय कोरोनामुळे दरमहा तेवढेच धान्य ग्रामस्थांना मोफत देण्यात दिले जात आहे. काही कुटुंबांत लहान मुले असतील तर त्यांना शाळेतून शालेय पोषण आहार योजनेतून धान्य मिळत आहे. परिणामी एवढे धान्य एका महिन्यात संपवणे अशक्य आहे. 

दिवाळीचा फराळही
कोरोनात कामधंदा नसल्याने गरीब कुटुंबांना तांदूळ व गहू तर मिळाले; पण तेल, मीठ, मिरची, डाळी, मसाले, चहा, साखर आदी आणायचे कुठून? नेमकी गरीब कुटुंबांची ही स्थिती ओळखून अनेक युवकांनी छोटा हत्ती वाहन घेऊन गावोगाव गहू, तांदूळ, गोळा करीत व त्याबदल्यात त्यांना अन्य गरजेचा माल देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या दिवाळीच्या दिवसांत चिवडा व अन्य गोड पदार्थ दिले जात आहेत. 

गरज पुरविण्यासाठी सारेकाही
काहींनी तांदळाचे पापड तयार करून विक्री सुरू केली आहे. बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेली कुटुंबे गहू, तांदूळ विकून बदल्यात आर्थिक लाभ मिळवून घेतला आहे. आता हा व्यवसाय योग्य की अयोग्य याचा खोलात न जाता गरजेतून ही स्थिती निर्माण झाली आहे. यात ग्राहक व व्यावसायिक दोघांचा लाभ आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे