esakal | धुळे जिल्ह्यातील शाळांचा निर्णय अहवाल आल्यानंतरच 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यातील शाळांचा निर्णय अहवाल आल्यानंतरच 

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली, तरी धोका टळलेला नाही. दुसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी केलेल्या तयारीचा शिक्षण विभागाने येत्या सात दिवसांत आढावा घेतला जाणार आहे. 

धुळे जिल्ह्यातील शाळांचा निर्णय अहवाल आल्यानंतरच 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज


धुळे ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यासाठी शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूक्ष्म नियोजन करावे, कृतिगट गठीत करावेत, शाळा व्यवस्थापन, शिक्षण संस्थाचालक, शिक्षक-पालक समिती पदाधिकाऱ्यांनी शाळांच्या तयारीची पाहणी करावी व याबाबतचा अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिक्षण विभागाला दिले. अहवालानंतर लगेचच वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे श्री. यादव यांनी स्पष्ट केले. 

वाचा- निवृत्‍तीनंतरही गुन्‍ह्याची कागदपत्रे ठेवली स्‍वतःजवळ

शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन, कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण व उपाययोजना आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी दोनला बैठक झाली. जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., महापालिका आयुक्त अजीज शेख, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, डॉ. अरुण मोरे, डॉ. दीपक शेजवळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे (माध्यमिक), मनीष पवार (प्राथमिक) आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, की जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली, तरी धोका टळलेला नाही. दुसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी केलेल्या तयारीचा शिक्षण विभागाने येत्या सात दिवसांत आढावा घ्यावा. शाळा सुरू करण्यापूर्वी व नंतरच्या आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शाळांकडे पुरेशा प्रमाणात थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध आहेत का, याचीही खात्री करावी. वाहतूक आराखडा निश्चित करावा. याशिवाय पालकांच्या संमतीचीही माहिती सादर करावी. नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शाळांच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी विस्ताराधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे सीईओ वान्मती सी. यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image