धुळ्यात ‘कोरोना’च्या लसीकरणासाठी धर्मगुरूंची मदत 

रमाकांत घोडराज
Tuesday, 15 December 2020

धार्मिक स्थळांवर येणाऱ्या नागरिकांना मास्क, सॉनटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्ट पाळण्याबाबत धर्मगुरूंनी सूचना द्याव्यात.

धुळे ः कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे तसेच धर्मगुरूंची मदत घेण्याचा निर्णय महापालिका स्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत झाला. चार टप्प्यात लसीकरणाचे नियोजन आहे. दरम्यान, लशी साठविण्यासाठी आवश्‍यक व्यवस्था करण्यात आल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 

आवश्य वाचा- मोलमजुरी करणाऱ्या गरीब युवकांचे असे ही श्रीमंत मन !

कोरोना लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळाल्यानंतर आरोग्य सेवा अतिरिक्त संचालकांच्या सूचनेनुसार मनपास्तरीय टास्क फोर्स गठीत करण्यात आले. टास्क फोर्सची सोमवारी (ता. १४) सकाळी अकराला महापालिकेत बैठक झाली. आयुक्त अजीज शेख अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेच्या अध्यक्षा डॉ. जया दिघे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजकुमार सूर्यवंशी, मनपाचे आरोग्याधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. महेश मोरे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रशांत पाटील, नेहरू युवा केंद्राचे अध्यक्ष अशोक मेघवाल, फादर विल्सन रॉड्रीक्स, एकवीरादेवी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव, सिंधी समाजाचे अध्यक्ष गणेश महाराज आदी उपस्थित होते. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सर्व धर्मगुरूंची मदत घेण्यात येईल, असे बैठकीत ठरले. 

दरम्यान, धार्मिक स्थळांवर येणाऱ्या नागरिकांना मास्क, सॉनटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्ट पाळण्याबाबत धर्मगुरूंनी सूचना द्याव्यात, १७ जानेवारी २०२१ ला होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठीही धर्मगुरूंनी मदत करावी, असे आवाहन आयुक्त शेख यांनी केले. 

लसीकरणाचे नियोजन असे ः 
-पहिल्या टप्प्यात सर्व सरकारी, खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस 
-दुसऱ्या टप्प्यात पोलिस कर्मचारी, होमगार्ड व सफाई कर्मचाऱ्यांना लस 
-तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस 
-चौथ्या टप्प्यात ५० वर्षांच्या आतील व कोमॉर्बिड (रक्‍तदाब, मधुमेह, किडणीचे आजार व इतर आजार) असलेल्या नागरिकांना लस 
-लशी साठविण्यासाठी चार मोठे डिपफ्रीजर, सात लहान डिपफ्रीजर, तीन मोठे आयएलआर (आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर), सात आयएलआर (आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर)ची व्यवस्था  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule religious leaders help in vaccinating corona in dhule