esakal | धुळ्याच्या पश्‍चिम पट्ट्यात भात कापणीला सुरवात ! 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्याच्या पश्‍चिम पट्ट्यात भात कापणीला सुरवात ! 

पश्चिम पट्ट्यातील तांदूळ खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट असल्याने मोठ्या प्रमाणात तांदळास बाजारपेठेत मागणी आहे. या वर्षी पावसाची मेहेरबानी शेवटपर्यंत होती.

धुळ्याच्या पश्‍चिम पट्ट्यात भात कापणीला सुरवात ! 

sakal_logo
By
भिलाजी जिरे


वार्सा ः पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील शेतकरी भाताची कापणी व काढणीच्या कामात मग्न असून, या वर्षी भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. विविध संकरित वाणांची लावणी व रोपणामुळे परिसरात सुगंध पसरला आहे. 

वाचा- गहू, तांदुळ द्या अन्‌ घेवून जा हवे ते; दिवाळीमुळे मिळतोय फराळ

भात उत्पादनात पिंपळनेर व आदिवासी पश्चिम पट्टा अग्रेसर होता. फड बागायतीत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पिंपळनेरच्या बागायती क्षेत्राला बिगरशेती करण्याचे मोठे ग्रहण लागले आहे व पुरेसा पाऊस होत नसल्यामुळे भातशेती कायमची थांबली, पण आदिवासी पश्चिम पट्ट्यात शेतकऱ्यांनी विविध संकरित वाण कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार आजही जिवंत ठेवले आहे. 

रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्‍पादनात घट 
पश्चिम पट्ट्यातील तांदूळ खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट असल्याने मोठ्या प्रमाणात तांदळास बाजारपेठेत मागणी आहे. या वर्षी पावसाची मेहेरबानी शेवटपर्यंत होती, म्हणून भातपीक तग धरून होते. काही शिवारात भातावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे काहीअंशी उत्पादनात घट होईल. भाताचे उत्पादन कितीही वाढले, तरी रोपणी भाताचा तांदूळ जादा दराने विकला जातो. चवीला स्वादिष्ट असल्याने बाजारपेठेत मागणी व पुरवठ्याचे अर्थशास्त्रही मागे पडते. चांगल्या प्रतीचा व दर्जेदार तांदूळ खरेदीसाठी घरापर्यंत पोचतो. चिमणसाळ, खुशबू, इंद्रायणी आदी विविध वाणाचे पीक असते. 

इंद्रायणीचे उत्‍पन्न भरपूर 
पश्चिम पट्ट्यात ६० टक्के शेती भाताची आहे. यात आंबेमोहोर, बासमती, इंद्रायणी, सुकवेल, भवाड्या, खुशबू चिमणसाळ व दोडक्या या जातीचे पीक अधिक आहे. यात सुकवेल भाताचे उत्पादन एकरी कमी व खर्चिक आहे, पण भाव जास्त मिळतो. इंद्रायणीचे उत्पादन भरपूर व दरही समाधानकारक असतो. 

बाजारावर लॉकडाउनचा परिणाम 
सध्या बाजारपेठेत नवा तांदूळ दाखल होण्याची शक्यता आहे. वार्सा, पिंपळनेर, दहिवेल येथील आठवडेबाजारात तांदूळ विक्री होते. मात्र, हे सर्व बाजार लॉकडाउनमुळे बंद आहेत. 


बारीपाडा व लगतच्या शेतीशिवारात चारसूत्री पद्धतीने रोपणी करून भाताचे पीक घेतले जाते. उत्पादन येण्याची शक्यता असते. सध्या कापणी हाताने किंवा यंत्राच्या सहाय्याने करीत आहेत. यामुळे मजुरीचा भार कमी झाला आहे. यंत्राचा वापर महिलाही कौशल्याने करतात. यामुळे कापणी यंत्राचा फायदा होत आहे. 
-चैत्राम पवार, आदिवासी समाजसेवक 

संपादन- भूषण श्रीखंडे