धुळे जिल्ह्यात शाळा ७ डिसेंबरपासून सुरू होणार  

निखील सुर्यवंशी
Wednesday, 2 December 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखत शाळा सुरू करण्यासाठी दिलेल्या निकषांचे पालन होते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने फिरते पथक ठेवावे.

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ७ डिसेंबरपासून सुरू करावेत, असे निर्देश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. 

जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी (ता. १) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी यादव अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, महापालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. दीपक शेजवळ, शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे (माध्यमिक), मनीष पवार (प्राथमिक) आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती, प्रशासकीय यंत्रणा आणि शिक्षक-पालक संघाच्या संमतीनंतर पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू कराव्यात. कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. वेळोवेळी शाळाखोल्या स्वच्छ कराव्यात. विद्यार्थ्यांची थर्मल गनने तपासणी, ऑक्सिमीटर ठेवावे. शिक्षकांनी मुख्यालयी थांबावे. ग्रामीण शाळा सुरू केल्यावर शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत दुसऱ्या टप्प्यात निर्णय होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखत शाळा सुरू करण्यासाठी दिलेल्या निकषांचे पालन होते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने फिरते पथक ठेवावे. परिवहन विभागाने विद्यार्थी वाहतुकीची वाहने नियमितपणे सॅनिटाइझ केली जातील याची खबरदारी बाळगावी. नववी ते बारावीपर्यंतचे जे विद्यार्थी शाळेपर्यंत पोचू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षण सुविधा द्यावी. त्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने कृती आराखडा तयार करून सादर करावा. सीईओ वान्मती सी., शिक्षणाधिकारी बोरसे, श्री. पवार यांनी उपाययोजनांची माहिती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule schools in dhule district will start from seven december