धुळ्यातील वरिष्ठ डाक अधीक्षकाचा औरंगाबादमध्ये मृत्यू 

बी. एम. पाटील  
Saturday, 16 May 2020

कैद्याचा व्यवसनामुळे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. 

धुळे ः कोरोना बाधित असल्याने मूळचे औरंगाबादस्थित आणि धुळे जिल्ह्याचे वरिष्ठ प्रवर डाक अधीक्षक यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. औरंगाबाद येथे ही घटना घडली. ते धुळ्यातून शनिवारी औरंगाबादला परतले होते. तेथे घाटी रूग्णालयाने घेतलेले त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. ही घटना आज येथे कळाल्यानंतर टपाल खात्यात खळबळ उडाली. तत्पूर्वी, मृत कैदी आणि गर्भवती महिला शुक्रवारी कोरोना बाधित आढळली होती. 
 
येथील कोरोना टेस्ट लॅबने धुळे शहरातील तरुण कैद्यासह गर्भवती महिला बाधित झाल्याचा अहवाल आज दिली. तसेच दिवसभरात 65 व्यक्तींनी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयास तपासणीसाठी घशाच्या स्त्रावाचे नमुने दिले. रुग्णालयातून दोन महिला व दोन कोरोनामुक्त पुरुषांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 36 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 66, तर सर्वाधिक धुळे शहरात 56 कोरोना बाधित रुग्ण आढळले. पैकी एकूण 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उर्वरित 36 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यात प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिला आणि तरुण कैद्याचा समावेश आहे. तरुण कैद्याचा व्यवसनामुळे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. 

"ते' 13 जण क्वारंटाइन 
संबंधित तरुण कैदी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याअंतर्गत पकडला गेला. त्याने मजुरांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर तो 9 मेस कारागृहात गेला. तेथे त्याची प्रकृती खालावली. त्याला अमली पदार्थ, मद्याचे व्यसन होते. त्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी होती. यात उपचारावेळी त्याचा जिल्हा रूग्णालयात 13 मेस मृत्यू झाला. या स्थितीमुळे त्याच्या संपर्कातील एकूण 13 पैकी काही कैद्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना स्वतंत्र बॅरेक, क्वार्टरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Senior Postal Superintendent corona ded in Aurangabad