धुळ्यात आता लहान पूल वाहतुकीसाठी खुला 

विजय शिंदे
बुधवार, 25 मार्च 2020

वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. केवळ रूग्णवाहिकांसह आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्यांसाठी पांझरा नदीवरील वीर सावरकर पुतळ्यावरील कॉजवे (लहान) पूल वाहतुकीसाठी खुला ठेवला जाईल. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला.

धुळे : "कोरोना' विषाणूजन्य संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासह शहरातील गर्दी टाळणे आणि संचारबंदीत विनाकारण हिंडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने आज (बुधवारी) रात्रीपासून महत्त्वाचे पूल बंद करण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेतला. वाहतुकीसाठी पांझरा नदीवरील केवळ लहान पूल खुला राहणार आहे. विनाकारण हिंडणाऱ्यांमुळे "करेगा कौन और भरेगा कौन', अशी स्थिती निर्माण झाल्याचे या निर्णयावरून दिसते. 

स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यालगत लहान पूल वगळता धुळे शहरातील पांझरा नदीवरील उर्वरित तीन पूल वाहतुकीसाठी संपूर्ण बंद ठेवले जातील. पांझरा नदीवरील वीर सावरकर मार्गावरील एकच लहान पूल आपत्कालीन सेवेसाठी खुला राहील. त्यामुळे धाक नसलेल्या धुळेकरांना "कोरोना'ने वेसण घातल्याचे चित्र अधोरेखित होते. 

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या चिंतन हॉलमधील सभागृहात "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी संयुक्त बैठक झाली. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्‍त अजीज शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, मनपा उपायुक्त गणेश गिरी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 
शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही विनाकारण काही नागरिक, तरुण हिंडताना दिसतात. त्यामुळे पोलिसांवर ताण वाढतो. तसेच संभाव्य गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाची दमछाक होते. जीवनावश्‍यक वस्तूंची ने- आण करण्यासाठी नागरिकांचीही मोठी झुंबड उडते. संचारबंदीत होणारी गर्दी टाळण्यासाठी, तसेच विनाकारण हिंडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी शहरातील पांझरा नदीवरील तीन पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. केवळ रूग्णवाहिकांसह आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्यांसाठी पांझरा नदीवरील वीर सावरकर पुतळ्यावरील कॉजवे (लहान) पूल वाहतुकीसाठी खुला ठेवला जाईल. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Small pool now open for traffic in the mist