esakal | मुलगा म्हणतो...वडीलांचा  अंत्यसंस्कार तुम्हीच करा... 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule

हे अधिकारी- कार्यकर्ते आले पुढे... 
संबंधित एरंडोल तालुक्‍यातील कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीचा मृतदेह चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात पडून होता. अखेर आज सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमिन पटेल, मनपाचे सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे यांनी चितेला अग्निडाग दिला. अबु अन्सारी, निहाल अन्सारी, डॉ. सलमान जहुर, आबिद पहेलवान, इस्लाम काल्या, सलीम टेलर, आबिद ,स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, भरत येवलेकर यांनी अंत्यसंस्कारासाठी सहकार्य केले. यातून पुन्हा एकदा सामाजिक ऐक्‍याचा संदेश दिला गेला. 

मुलगा म्हणतो...वडीलांचा  अंत्यसंस्कार तुम्हीच करा... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे,ः माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार महापालिकेच्या यंत्रणेकडून करावा...माझी हरकत नाही... असा थेट अर्ज आहे एका मुलाचा...संबंधित मुलाच्या वडिलांचा "कोरोना'मुळे येथे मृत्यू झाला आणि त्याने आपल्याच जन्मदात्याचा मृतदेह स्वीकारण्यास, मृतदेहावर अंत्यसंस्कारास नकार दिला... मुलाच्या या नकारानंतर मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची कसरत करावी लागली. 
 
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी महापालिकेचे संबंधित अधिकारी आता वैतागले आहेत. 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह स्वीकारणे, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा तिढा गेल्या अडीच- तीन महिन्यांपासून कायम आहे. संबंधित मृत व्यक्तीचा मृतदेह मुलं, नातेवाईक- आप्तेष्ट, मित्र परिवार आदी कुणीही घेण्यास पुढे येत नसल्याच्या अनेक घटना घडल्या. अशा घटना आजही सुरू आहेत. 
 
एरंडोल तालुक्‍यातील (जि. जळगाव) एका गावातील व्यक्तीचा "कोरोना'मुळे धुळ्यात मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मुलानेही आपल्या जन्मदात्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने थेट श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा कोविड नोडल अधिकाऱ्यांना ना हरकत अर्ज दिला. 
 
अर्जात म्हटले की... 
संबंधित मुलाने दिलेल्या अर्जात म्हटले, की मी मयतचा मुलगा...धुळे येथे तहसिलदारांचा प्रतिनिधी तलाठ्यासोबत 15 जूनला रात्री एकपर्यंत सर्वोपचार रूग्णालयात आलो. तेव्हा आपण सकाळी या असे सांगितले. 16 जूनला सकाळी माझ्या वडिलांचे शासकीय यंत्रणेमार्फत अंत्यसंस्कार करा, असे लेखी देतो असे मी म्हटले. तेव्हा आपल्या लोकांनी तुम्ही जा, असे सांगितले. आमचे स्वॅब घेण्यासही नकार दिला. म्हणून मी कंटाळून एरंडोलला कोविड केंद्रात आलो. आता 16 जूनला रात्री नऊला अर्ज लिहून देतो की, माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार शासकीय यंत्रणेमार्फत (मनपा) करावा, माझी हरकत नाही... 

किती दिवस असेच करायचे 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्‍तीचे कुटुंबातील सदस्य, नातेवाईकच मृतदेह स्वीकारून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देतात, पुढे येत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पीपीई किट घालून अशा व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. मदतीसाठीदेखील या अधिकाऱ्यांना इतर कुणाची तरी मदत घ्यावी लागते, त्यासाठी संबंधितांना तयार करावे लागते. वास्तविक नातेवाइकांनी पीपीई किट घालून हा सर्व सोपस्कार पूर्ण करावा, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा असते, मात्र नातेवाईक दूर उभे राहतात अथवा येतच नाहीत. अशा घटनांनी मात्र संबंधित अधिकारी आता वैतागले आहेत. आम्ही असे किती दिवस करत राहायचे असा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यामुळे या तिढ्यातून मार्ग काढण्याची गरज व्यक्त होते. 
 

loading image