सोनगीर ग्रामपंचायत निवडणूकीचे आरक्षण जाहीर

एल. बी. चौधरी
Saturday, 7 November 2020

जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत धुळे तालुक्यातील 72, साक्री तालुक्यातील 49, शिंदखेडा तालुक्यातील 63 आणि शिरपूर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात येत आहे.

सोनगीर (धुळे) : जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या एकूण 221 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असून प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सरपंच आरक्षण अद्याप झाले नाही. सरपंच निवड जनतेतूनच की निवडून आलेल्या सदस्यांतून याचा निर्णय बाकी आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. युवकांमध्ये निवडणूकीची उत्सुकता दिसून येत आहे.
जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत धुळे तालुक्यातील 72, साक्री तालुक्यातील 49, शिंदखेडा तालुक्यातील 63 आणि शिरपूर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात येत आहे. त्यापैकी धुळे तालुक्यातील 40, साक्री तालुक्यातील 22 व शिंदखेडा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक झाली आहे. 

स्‍थगीतीनंतर कामकाज प्रारंभ करण्याचे आदेश
धुळे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया जाहीर करणे आदी कामांना निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला होता. मात्र कोरोना संकटामुळे 17 मार्चला ही प्रक्रिया ज्या स्थितीत होती; त्याच स्थितीत थांबविण्यात आली होती. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुन्हा त्याच स्थितीवरून पुढे कामकाजास प्रारंभ करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने नुकतेच दिले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारींनी प्रभाग रचना व आरक्षणास अंतिम मान्यता देऊन स्वाक्षरी केली असून दोन नोव्हेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. 

सोनगीरमधून सतरा सदस्‍यांसाठी निवडणुक
सोनगीर ग्रामपंचायतीकरीता प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. येथे प्रभागांतील सदस्यपदांचे आरक्षण जाहीर झाले असून सात प्रभागात 17 सदस्य निवडले जातील. त्यात नऊ महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. 

आरक्षण रचना (प्रभाग क्रमांक, निवडावयाचे सदस्य संख्या व आरक्षण) 

- 1 तीन, अनुसूचित जमाती एक पुरुष व एक महिला राखीव आणि एक खुला, 
- 2 तीन, नामाप्र महिला एक, सर्वसाधारण महिला एक, खुला एक
- 3 दोन, नामाप्र महिला एक, खुला एक
- 4 तीन, नामाप्र पुरुष एक, सर्व साधारण महिला एक, खुला एक
- 5 तीन, नामाप्र महिला एक, सर्वसाधारण महिला एक, खुला एक
-6  तीन, नामाप्र पुरूष एक, अनुसूचित जाती महिला एक, सर्वसाधारण महिला एक.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule songir gram panchayat election aria reservation declear