esakal | धुळ्यात लवकरच "कोरोना व्हायरस'ची तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात लवकरच "कोरोना व्हायरस'ची तपासणी 

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व्हीडीआरएल (व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक्‍स लॅब्रॉटरी) यंत्रणेंतर्गत आरटी पीसीआर (रिअल टाइम पीसीआर) यंत्रणा लवकरच महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. 

धुळ्यात लवकरच "कोरोना व्हायरस'ची तपासणी 

sakal_logo
By
बी. एम. पाटील

धुळे ः कोरोना व्हायरसची वाढती लागण लक्षात घेता राज्यात मुंबईपाठोपाठ आता धुळ्यातही कोरोना तपासणी यंत्रणेस शासनाने मंजुरी दिली आहे. येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयात येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीनंतर चोवीस तासांत अहवाल (रिपोर्ट) प्राप्त होतील. सद्यःस्थितीत स्त्रावाच्या नमुन्यांची पुणे येथे तपासणी होत आहे. 

महाविद्यालयाशी निगडित धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मालेगाव, बागलाण, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, अमळनेर तालुका, मध्य प्रदेशातील असंख्य रुग्ण येतात. त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, तसेच, कोरोनासदृश किंवा विदेशातून परतलेल्यांची वैद्यकीय तपासणी होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व्हीडीआरएल (व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक्‍स लॅब्रॉटरी) यंत्रणेंतर्गत आरटी पीसीआर (रिअल टाइम पीसीआर) यंत्रणा लवकरच महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. 

सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एन. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेचे कामकाज चालेल. डॉ. एच. आर. अडचित्रे, डॉ. सुप्रिया मालवीय, डॉ. माधुरी सूर्यवंशी यांच्यासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल यादव, राहुल खैरनार, योगेश सोनवणे, पूजा ब्राह्मणे आदी कामकाज पाहतील. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. महाविद्यालयास यंत्रणा मिळावी, यासाठी अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी आदींनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. डॉ. द्रविड यांनी सांगितले, की शासकीय महाविद्यालयात प्राप्त होणारे नमुने पुणे येथे पाठविले जातात. यासंबंधी रिपोर्ट ची प्रतीक्षा करावी लागते. ती धुळ्यातील सुविधेमुळे संपुष्टात येऊन तपासणी रिपोर्ट लवकर मिळू शकेल. 
 

loading image