esakal | धुळ्यातील अनधिकृत होर्डींग काढण्यासाठी थेट पोलीस अधिक्षक उतरले रस्त्यावर !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यातील अनधिकृत होर्डींग काढण्यासाठी थेट पोलीस अधिक्षक उतरले रस्त्यावर !

थेट पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते. त्यामुळे श्री. पंडित स्वतःच दुपारी दोन ते अडीचदरम्यान संबंधित होर्डींग काढण्यासाठी दाखल झाले.

धुळ्यातील अनधिकृत होर्डींग काढण्यासाठी थेट पोलीस अधिक्षक उतरले रस्त्यावर !

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः अनधिकृतपणे होर्डींग लावल्याच्या प्रकारामुळे शहरात आज वेगळे चित्र पाहायला मिळाले. अनधिकृत होर्डींगबाबत तक्रारीनंतर थेट पोलीस अधीक्षकांनाच संबंधित होर्डींग काढण्यासाठी जावे लागले. विशेष म्हणजे कारवाईसाठी पोलीस अधीक्षक केवळ उपस्थितच राहिले नाहीत तर त्यांनी स्वतःच ते काढण्यासाठी मदत केली. 

धुळे शहरात अनधिकृत होर्डींग लावण्याचे प्रकार नवीन नाहीत. या प्रकारांना अलीकडच्या काळात ऊत आल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे जी महापालिका बॅनर लावण्यासाठी परवानगी देते. त्याच महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर लागलेले असतात. शहरात काही व्यक्ती, संस्थांनी ठिकठिकाणी बॅनर/होर्डींग लावण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेऊन तेथे होर्डींग लावण्यासाठी लोखंडी स्टॅण्ड उभे केले आहेत. अशा भाडेतत्त्वावरील होर्डींग स्टॅण्डवरही अनधिकृतपणे होर्डींग लावले जातात. अशाच एका प्रकरणात सागर कांबळे यांच्या वाढदिवसाचे होर्डींग लहान पुलाजवळील होर्डींग स्टॅण्डवर लावले होते. या अनधिकृत होर्डींगबाबत संबंधितांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली होती. 


या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळी संबंधित होर्डींगच्या ठिकाणी पाहणी केली. नंतर काही घडामोडी झाल्या व संबंधितांनी नंतर थेट पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते. त्यामुळे श्री. पंडित स्वतःच दुपारी दोन ते अडीचदरम्यान संबंधित होर्डींग काढण्यासाठी दाखल झाले. इतर पोलीस अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. शिडी लावून संबंधित होर्डींग काढण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, होर्डींग काढण्यासाठी श्री. पंडित यांनीच हातात बांबू घेत मदत केल्याचे चित्रही दिसले. अनधिकृत होर्डींग काढण्यासाठी थेट पोलीस अधीक्षकांना जावे लागल्याचे हे चित्र यंत्रणेवर विविध प्रश्‍न उभे करणारे आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे