esakal | चाळीस वर्षांत चौथ्यांदा थांबली टॅक्‍सीची चाके 
sakal

बोलून बातमी शोधा

taxi

शहरात अत्यावश्‍यक कामासाठी सेवा पुरविली जात आहे. अपघात, दवाखाने, पोलिस ठाण्यातील तक्रारी आदी महत्त्वाच्या कामाशिवाय टॅक्‍सीचालक प्रवाशांना कुठेही सोडण्यास तयार नाहीत. 

चाळीस वर्षांत चौथ्यांदा थांबली टॅक्‍सीची चाके 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : "कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली आहे. शासनाच्या निर्णयाला साथ देण्यासाठी धुळे, अमळनेर, नंदुरबार, शहादा व मालेगाव येथील टॅक्‍सी चालक-मालक संघटना स्वयंस्फूर्तीने "बंद'मध्ये सहभाग नोंदविला. अपघात व आरोग्याच्या मदतीसाठी संघटना प्रवाशांच्या सोयीसाठी धावून जात आहे. चाळीस वर्षांत चौथ्यांदा टॅक्‍सीची चाके थांबल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. 

"जनता कर्फ्यू'नंतर राज्यात संचारबंदी लागू झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बसस्थानकावर शुकशुकाट असेल. बसस्थानकावर प्रवासी येत नसले, तरी बाजूलाच असलेल्या टॅक्‍सीसाठी काही प्रवाशांकडून विचारणा होत आहे. एसटी बंदनंतर प्रवाशांना खासगी टॅक्‍सीचालकांचा आधार होता; परंतु टॅक्‍सी संघटनेनेही शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. धुळ्याहून बाहेर तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या टॅक्‍सी बंद झाल्या आहेत. केवळ शहरात अत्यावश्‍यक कामासाठी सेवा पुरविली जात आहे. अपघात, दवाखाने, पोलिस ठाण्यातील तक्रारी आदी महत्त्वाच्या कामाशिवाय टॅक्‍सीचालक प्रवाशांना कुठेही सोडण्यास तयार नाहीत. 

चाळीस वर्षात चौथ्यांदा बंद 
धुळे शहर टॅक्‍सी चालक-मालक संघटनेची स्थापना 1983मध्ये झाली. ऍम्बेसिडर गाडीपासून सुरू झालेला हा प्रवास टॅक्‍सी व ओम्नी वाहनापर्यंत आला आहे. गेल्या 40 वर्षांत धुळ्यात दोन दंगली व बर्ड फ्लू नंतर चौथ्यांदा टॅक्‍सी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. 112 टॅक्‍सींपैकी सध्या 50 टॅक्‍सी अत्यावश्‍यक सेवांसाठी सुरू आहेत. 

कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे आम्ही स्वयंस्फूर्तीने शासनाच्या "बंद'ला पाठिंबा दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्‍यक सेवांसाठीच टॅक्‍सी सुरू राहतील. नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्याचा प्रयत्न करावा. 

- भरत शर्मा, उपाध्यक्ष, टॅक्‍सी चालक-मालक संघटना, धुळे शहर