esakal | दहा दिवसात धुळे आगारातील एसटी’ने केला साडेतीन लाख किलोमीटर प्रवास !
sakal

बोलून बातमी शोधा

दहा दिवसात धुळे आगारातील एसटी’ने केला साडेतीन लाख किलोमीटर प्रवास !

सुरवातीचे काही दिवस कोरोनाच्या भीतीपोटी नागरिकांचे पाय एसटीकडे वळले नव्हते. हळूहळू प्रवाशांचा हा ओघ आता वाढताना दिसत आहे.

दहा दिवसात धुळे आगारातील एसटी’ने केला साडेतीन लाख किलोमीटर प्रवास !

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे  ः कोरोना संकटामुळे रुतलेल्या एसटीच्या चाकांनी गती घेण्यास सुरवात केली आहे. आंतरजिल्हा बससेवा सुरू केल्यानंतर दहा दिवसात परिवहन महामंडळाचे धुळे विभागाने विविध मार्गांवर धावणाऱ्या बसनी साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, या दहा दिवसात एसटी बसमधून ५५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यातून राज्य परिवहन महामंडळाला ५८ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. 

कोरोना विषाणू संसर्गामुळे साडेचार-पाच महिने बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस शासनाने अनलॉक केल्यानंतर २० ऑगस्टपासून पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. मात्र, सुरवातीचे काही दिवस कोरोनाच्या भीतीपोटी नागरिकांचे पाय एसटीकडे वळले नव्हते. हळूहळू प्रवाशांचा हा ओघ आता वाढताना दिसत आहे. धुळे आगारातून सुटणाऱ्या व विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटीने गेल्या दहा दिवसांत एकूण तीन लाख ५५ हजार ४९० किलोमीटरचा प्रवास केला. यातून ५५ हजार प्रवाशांना विविध ठिकाणी प्रवास केला. 

५८ लाखांवर उत्पन्न 
गेल्या दहा दिवसांत परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाला प्रवासी भाड्यातून ५८ लाख ३८ हजार ६९८ रुपये उत्पन्न मिळाले. दरम्यान, प्रवासी वाहतूक बंद असताना एसटीने मालवाहतूक सुविधा सुरू केली होती. यातूनही गेल्या तीन महिन्यांत विभागाने २२ लाख १२ हजार ६८४ रुपये उत्पन्न मिळविले, अशी माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. 

धुळे विभागातून बसफेऱ्या 
संगमनेर-पुणे, जळगाव, नाशिक, नगर-पुणे, औरंगाबाद, चोपडा या लांब व मध्यम पल्ल्याच्या बस सुरू आहेत. शिवाय तालुकाअंतर्गत शिंदखेडा, शिरपूर, साक्री, नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, अक्कलकुवा, नवापूर आदी बसफेऱ्याही सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बस सॅनिटाईझ केली जाते. बसमध्ये २२ प्रवासी बसवले जातात, शिवाय बसमध्ये दोन प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्स राखून व मास्क बांधण्याचे बंधन पाळून प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. 
 

परीक्षांसाठीही सेवा उपलब्ध 
‘एनडीए‘ तसेच वैद्यकीय प्रवेशाची ‘नीट’ परीक्षा ६ सप्टेंबर व १३ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जादा बसचे नियोजन केले आहे. २२ विद्यार्थ्यांच्या ग्रुपने नजीकच्या आगाराशी संपर्क केल्यास त्यांना बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे आवाहन विभागप्रमुख श्रीमती सपकाळ यांनी केले आहे .